पुणे : पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे पत्रकार प्रतिक गंगणे यांना प्रतिष्ठेचा ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार’ जाहीर झाला असून, आज (३१ ऑक्टोबर) पुण्यात आयोजित विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिक गंगणे हे दैनिक आरंभ पर्वचे व्यवस्थापकीय संपादक तसेच ‘पुणे प्रहार’चे संपादक म्हणून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, जनसामान्यांचे प्रश्न मांडणे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताच्या विषयांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी पुरस्काराची घोषणा केली आहे.
आज, शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत पुण्यातील नवी पेठ येथील संकल्प बँक्वेट हॉल, एलबीएस मार्ग येथे हा सोहळा पार पडणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा असलेले रवींद्र साठे हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्यात पत्रकार प्रतिक गंगणे यांच्यासह डॉ. पांडुरंग दगडू सराफ, ममता यशवंत पाटील, विजयमाला महादेव पवार, ज्योती नाळे, डॉ. स्मिता सहस्रबुद्धे यांच्यासह समाजसेवा, शिक्षण, साहित्य, पत्रकारिता, आरोग्य, कृषी, सहकार, पर्यावरण, अध्यात्म, दिव्यांग सेवा आणि विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेच्या विचारांना अभिवादन करत समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करणे हा या पुरस्कार सोहळ्यामागील मुख्य उद्देश आहे.
पत्रकार प्रतिक गंगणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याने पत्रकारिता क्षेत्रासह विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





