गंभीर आजारांवर आता गोव्यातही आयुर्वेदिक उपचारांची मात्रा

पुणे: पुण्याची चिकित्सक दृष्टी व गोव्याची औषधी परंपरा आता एका सूत्रात गुंफली जाणार असून, कर्करोग व अन्य गंभीर आजारांवर गोव्यातही आता अत्याधुनिक आयुर्वेदिक उपचारांची मात्रा उपलब्ध होणार आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त कर्करोग व अन्य गंभीर आजारांवरील उपचार व संशोधनासाठी पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिक आणि गोव्यातील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, तसेच शिरोडा (गोवा) येथील कामाक्षी आरोग्यधाम यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.

या महत्त्वपूर्ण कराराद्वारे आयुर्वेदाच्या माध्यमातून कर्करोगासारख्या दीर्घकालीन आणि गंभीर आजारांवरील उपचार व शिक्षण अधिक सक्षमपणे पुढे नेले जाणार आहे. या सामंजस्य कराराचे आदानप्रदान नुकतेच झाले. यानिमित्ताने कामाक्षी आरोग्यधाममध्ये कर्करोग व गंभीर आजारांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी रसायू लाईफसायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश बेंडाळे, डॉ. विनिता बेंडाळे, गोव्याचे पर्यटन व माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, जलसंपदा व महामंडळ मंत्री सुभाष शिरोडकर, गोवा कौन्सिल ऑफ आयुर्वेदच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत, भारतीय संस्कृत प्रबोधिनीचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. योगेश बेंडाळे म्हणाले, “मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विशेष पुढाकाराने गोव्यामध्ये आयुर्वेद आणि पाश्चात्य वैद्यक तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावरून रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून चिकित्सा देण्याची यंत्रणा प्रत्यक्षात आणली गेली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गोव्यातील असंख्य कर्करुग्णांना दोनही उपचार पद्धतींचा फायदा एकाच छताखाली मिळण्याची सोय उपलब्ध  झालेली आहे. याकरीता टाटा मेमोरिअलच्या सर्व डॉक्टरांनी केलेले विशेष प्रयत्न उल्लेखनीय आहेत.”

गोव्यातच तपासणी व उपचार मिळणार

गेल्या २५ हून अधिक वर्षे रसायू आयुर्वेद क्लिनिक गंभीर आणि दीर्घकालीन आजारांवरील आयुर्वेद उपचारांमध्ये कार्यरत आहे. या करारामुळे गोव्यातील नागरिकांना अत्याधुनिक, संशोधनाधिष्ठित उपचार पद्धतींचा लाभ घेता येणार आहे. रसायूचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर नियमितपणे गोव्यात येऊन रुग्ण तपासणीसह उपचार करतील. तसेच गोव्यातील आयुर्वेद विद्यार्थी व वैद्य यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष व्यावसायिक प्रशिक्षण मिळणार आहे. या उपक्रमामुळे रुग्णांना आधुनिक आणि आयुर्वेद या दोन्ही पद्धतींचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

“गोव्यातील या नव्या सहकार्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचार अधिक प्रभावी आणि संशोधनाधिष्ठित पद्धतीने रुग्णांपर्यंत पोहोचतील. रसायूच्या दीर्घ अनुभवाचा आणि गोव्याच्या समृद्ध औषधी परंपरेचा संगम रुग्णांसाठी नवी आशा निर्माण करणार आहे. तसेच आयुर्वेद विद्यार्थी व वैद्यांना प्रत्यक्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणे हीदेखील एक महत्त्वाची पायरी ठरेल.”

– डॉ. योगेश बेंडाळे, व्यवस्थापकीय संचालक, रसायू लाईफसायन्सेस