पुणे : अंगावर नवा कोरा सलवार-कुर्ता, चेहऱ्यावर निरागस भाव अन नवीन कपड्यांचा आनंद, आपल्या अंगावरील नवे कपडे कुतूहलाने एकमेकांना दाखवत आनंदमय वातावरणात कामायनी संस्थेतील विशेष मुलांनी नव्या वर्षाचे स्वागत केले. गुढी पाडव्यानिमित्त कामायनी संस्थेतील ३०० विशेष मुलांना सलवार-कुर्ताचे वाटप करण्यात आले. युवा सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश कोंढाळकर व अनिकेत कोंढाळकर यांच्या पुढाकारातून वेस्टझोन परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गोखलेनगर येथील कामायनी संस्थेच्या मुनोत सभागृहात हा कार्यक्रम झाला.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या, माजी नगरसेविका प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेविका व मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, यशदा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर, बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध रांजेकर, मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक सचिन कुलकर्णी, कामयानी संस्थेच्या विश्वस्त श्रीलेखा कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉ. आशुतोष भूपटकर, ‘वेस्टझोन’चे ऋषिकेश व अनिकेत कोंढाळकर, नंदा कोंढाळकर, स्नेहा कोंढाळकर, धनश्री कोंढाळकर आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, “या विशेष मुलांमध्ये आल्यावर खूप वेगळा आणि सकारात्मक अनुभव मिळतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, निरागसपणा आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवणारा असतो. दैनंदिन कामात व्यग्र असलेल्या समाजाला सामाजिक जाणिवेची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुलांसमवेत संवादाचे उपक्रम सुरु करावेत. त्यातून या मुलांनाही मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल.” ऋषिकेश आणि अनिकेत यांनी केलेले हे कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजेश बनसोडे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांनी सादर केलेला बँड उत्कृष्ट होता. या मुलांमधून भविष्यात मोठी कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे घडू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. दिव्यांग मुलांची सेवा हीच खरी देवाची सेवा असून, अशा उपक्रमांमुळे समाजाला प्रेरणा मिळते, असे प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी नमूद केले. आशुतोष भूपटकर यांनी दिव्यांग कल्याणापासून दिव्यांग सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. दिव्यांग मुलांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो. या देवरूपी मुलांसोबत नववर्ष साजरे करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी आहे, अशी भावना रवींद्र साळेगावकर यांनी व्यक्त केली.
समाजातील वंचित घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग मुलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी उपयुक्त कपड्यांची विशेष तयारी करण्यात आली. या माध्यमातून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतानाच समाजात संवेदनशीलतेचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगत ऋषिकेश कोंढाळकर यांनी सर्वांचे आभार मानले.





