यशवंतरावांच्या दूरदृष्टीने मराठी नाटकांना करमणूक कर नाही; ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचे प्रतिपादन 

By: Editor_Manas

On: Friday, March 13, 2026 4:27 PM

Google News
Follow Us

पुणे: “ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत मराठी नाटकांवर करमणूक कर आकारला जाणार नाही, असा निर्णय घेतला होता. त्यांच्या या दूरदर्शी निर्णयाचे फायदे आजतागायत मराठी नाट्यसृष्टीला मिळत आहेत. कलासक्त यशवंतरावांचे हे द्रष्टेपण लक्षणीय होते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते सतीश आळेकर यांनी केले. सलग ४० वर्षे कविसंमेलन घेण्याचा वारसा ढेरे कुटुंबाने जपला आहे, हे दिलासादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. महेश कोठारे यांनी लोकप्रिय चित्रपट दिले. अनेक कलाकारांना स्टार करण्यात योगदान दिले. मराठी चित्रपटात नवे तांत्रिक व अद्भुताचे गारूड त्यांनी प्रथम निर्माण केले. त्यांचे सुपुत्र आदिनाथसोबत काम करण्याचा अनुभव घेतल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४० वे कवी संमेलन व यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या समारंभात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांना ‘यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार’, तर रानमाणूस प्रसाद गावडे यांना ‘अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप  होते. या दोन पुरस्कारांसह ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (काव्यसंग्रह-विस्मरणाच्या आरण्यात), चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर (दंडकारूण्य) व नाशिक येथील प्रतिभा पवार-खैरनार (कवितासंग्रह – वंशावळीच्या प्राचीन सरीतून) यांना प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रोख ११,००१ व सन्मानचिन्ह असे होते.

टिळक स्मारक मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यावेळी ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नीलिमा कोठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, संयोजक व प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, ट्रस्टचे गौरव फुटाणे, मित्र मंडळाचे सचिन जाधव, कुणाल जाधव, नगरसेवक व माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.

सतीश आळेकर यांनी यशवंतराव चव्हाण तसेच प्रकाश ढेरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या लेखन कारकिर्दीच्या सुरवातीला यशवंतराव आणि ढेरे, या दोघांशीही माझा संबंध आला होता. मराठी नाटकांचे दिल्लीमध्ये प्रयोग असले, की मराठी कलावंतांच्या पाहुणचारासाठी दिल्लीतील मराठी नेते आवर्जून पुढाकार घेत. त्यानिमित्ताने यशवंतरावांशी भेट घडली. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मराठी रंगभूमीसाठी करमणूक कर माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला, त्याचा फायदा मराठी नाट्यसृष्टी आजही घेत आहे. यशवंतराव अतिशय उत्तम वाचक होते, रसिक होते, त्याची अनेकदा प्रचिती आल्याचे आळेकर म्हणाले.

महेश कोठारे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार, तोही ढेरे कुटुंबीय आणि जिथून माझी कारकीर्द सुरू झाली, त्या गंगा लाॅज वास्तूशी निगडीत ट्रस्टकडून मिळणे, हा मी मोठा सन्मान समजतो. १९७५ मध्ये गंगा लाॅजच्या खालच्या मजल्यापासूनच माझी कारकीर्द सुरू झाली होती. मला गुरुसमान असणाऱ्या आण्णासाहेब देऊळगावकरांचे कार्यालय गंगा लाॅजच्या खालीच होते, असे सांगून कोठारे यांनी चित्रपटीय कारकिर्दीची माहिती दिली.

प्रसाद गावडे म्हणाले, कोकणातील नंदनवन असणाऱ्या गावांत राहून तिथेच काम करतो. निसर्गाशी, पर्यावरणाशी जुळवून घेत जगणारी माणसे आजही कोकणात आहेत. पर्यावरणस्नेही जगणे आणि शाश्वतता त्यांनी अबाधित राखली आहे. त्यांचे समृद्ध जगणे आजच्या तथाकथित विकासप्रक्रियेचे फलित नाही, हे आवर्जून सांगायला हवे. अजितदादा पवार यांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यासाठी आनंददायी आहे. कारण जल, जमिनीविषयी आस्था बाळगणारे ते नेते होते.

प्रास्ताविकात ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे म्हणाले, कवींनी सर्वसामान्यांचे जगणे, समस्या, दुःख यांचे प्रतिनिधित्व करावे. त्यांचे प्रश्नही कवितेतून मांडावेत, यासाठीच या उपक्रमाचे स्वरूप कवीसंमेलन, असे ठेवले आहे. गेली ४० वर्षे ते जपले आहे. तशीच श्रोत्यांनीही रसिकता जपली आहे. अंजली कुलकर्णी यांनी साहित्य पुरस्कारप्राप्त कवींचा परिचय करून दिला. राजेश्वरी थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. विजय ढेरे यांनी सर्वांचे आभार मानले.

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now