पिंपरी-चिंचवड शहर तसेच श्रीक्षेत्र आळंदीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी या प्रकल्पांकडे शासनाचे लक्ष वेधत निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून योगेश सागर यांनी आमदार लांडगे यांच्या मागणी प्रतिसाद दिला. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत विविध योजनांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.
AMRUT-३ योजनेअंतर्गत शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पासाठी सुमारे २०१६ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच पवना थेट जलवाहिनी प्रकल्पासाठी १०१५ कोटी रुपये, आंद्रा प्रकल्पातून १०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेसाठी २११ कोटी रुपये, तसेच २०० एमएलडी क्षमतेच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी ६० कोटी रुपये निधी देण्याचा प्रस्ताव आहे. भामा आसखेड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी स्काडा (SCADA) वॉटर बल्क मॅनेजमेंट प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्यात आली. भविष्यातील गरज लक्षात घेऊन चासकमान व मुळशी धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचीही मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी डुडूळगाव येथे इको टुरिझम पार्कसाठी २०० कोटी रुपये, आंतरराष्ट्रीय दर्जाचा सफारी पार्क, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुलाबपुष्प उद्यान उभारण्यासाठी १०० कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, नगरविकास विभागांतर्गत नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आवश्यक भूसंपादन निधी उपलब्ध करून देण्याची तसेच संविधान भवन उभारणीच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे.





