आळंदीचा समावेश ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ योजनेत करावा; खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

By: Editor_Manas

On: Friday, March 13, 2026 6:00 PM

Google News
Follow Us

पुणे : लाखो वारकऱ्यांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी शहराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ योजनेत करावा, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. लक्षवेधीद्वारे ही मागणी करीत संत परंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या आळंदीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राने विशेष पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे ठिकाण म्हणून आळंदी संपूर्ण देशातील भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात लाखो वारकरी आणि भाविक आळंदी येथे दाखल होत असतात. या काळात शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग आणि सार्वजनिक सुविधांवर मोठा ताण येतो. त्यामुळे नियोजनबद्ध विकासाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते, असे कुलकर्णी यांनी सभागृहात मांडले.

केंद्र सरकारने अलीकडील अर्थसंकल्पात मंदिर असलेल्या शहरांच्या आणि टियर-२ शहरांच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यावर भर दिला आहे. या धोरणाचा लाभ आळंदीला मिळाल्यास भाविकांसाठी आधुनिक सोयीसुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, नदीकिनारा विकास, पूरनियंत्रण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पार्किंग, रस्ते संपर्क आणि वारसा संवर्धन यांसारख्या अनेक प्रकल्पांना चालना मिळू शकते, असे आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

आळंदीची ओळख इंद्रायणी नदीशी अविभाज्यपणे जोडलेली असल्याचेही त्यांनी नमूद केले. नदीचे प्रदूषण नियंत्रण, पुनरुज्जीवन आणि नदीकाठाचा शाश्वत विकास यासाठी एकात्मिक नियोजनाची तातडीची आवश्यकता आहे. ‘टेंपल टाउन’चा दर्जा मिळाल्यास नदीसंवर्धन आणि शहर विकास यांचे एकत्रित नियोजन करणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आळंदीला ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ योजनेत समाविष्ट केल्यास शहराचा आध्यात्मिक वारसा जपत आधुनिक पायाभूत सुविधा उभारता येतील आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांना अधिक सुसज्ज व सन्मानजनक अनुभव मिळेल, असे मत खासदार कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच स्थानिक नागरिकांच्या जीवनमानातही लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026