पुणे,13 मार्च 2026 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथे लठ्ठपणा,चयापचय रोग आणि प्रगत बेरियाट्रिक सायन्सेससाठी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. लठ्ठपणा आणि संबंधित विकारांच्या शास्त्रीय आणि बहुविद्याशाखीय व्यवस्थापनासाठी समर्पित अशी ही व्यापक सुविधा आहे. या केंद्राचे उद्घाटन पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने,उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.दिविज माने, समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
लठ्ठपणा हा केवळ जीवनशैली निगडीत प्रश्न नसून आता एक वैद्यकीय स्थिती म्हणून ओळखला जात आहे.अलीकडेच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय कोडिंग प्रणाली (आयसीडी) मध्ये लठ्ठपणाला औपचारिकपणे एक आजार म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.यामुळे वैद्यकीय उपचार पध्दती आणि प्रगत बेरियाट्रिक प्रक्रियांसह संरचित उपचार पध्दतींची व्याप्ती वाढणार आहे.
महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की,असंसर्गजन्य रोग (नॉन कम्युनिकेबल डिसीजेस – एनसीडी) बाबत लोकांमध्ये पुरेशी जागरूकता नाही.याला गांभीर्याने घेण्याची गरज असून याबाबत लवकर निदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे.ते पुढे म्हणाले की,लठ्ठपणाच्या मुळाशी जाऊन उपचार करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम स्त्युत्य आहे.
लठ्ठपणा व्यवस्थापनासाठी एकात्मिक व व्यापक केंद्र
समग्र दृष्टीकोन ठेऊन प्रौढांसाठी तसेच लहान मुलांसाठी सर्व प्रकारच्या लठ्ठपणासाठी एकात्मिक आणि व्यापक उपचार करणारे हे अशा प्रकारचे अनोखे केंद्र आहे.लठ्ठपणासाठी वैद्यकीय सल्ला घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना बहुशाखीय तज्ञांच्या गटाद्वारे मार्गदर्शन केले जाईल.या गटामध्ये चिकित्सकांपासून शल्यचिकित्सक व मानसोपचारतज्ञांपर्यंत आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या तज्ञांचा समावेश आहे. या केंद्राद्वारे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार जागतिक दर्जाचे उपचार प्रदान केले जातील.
या नवीन केंद्रामध्ये बेरियाट्रिक सर्जन,प्लास्टिक सर्जन, पोषण तज्ञ,फिजिओथेरपीस्ट,समुपदेशक आणि ओबेसिटी एज्युकेटर्ससह बहुविद्याशाखीय टीम द्वारे एकात्मिक उपचार प्रदान केले जातील.या सुविधेमध्ये बॉडी कंपोझिशन ॲनालिसिस (शरीर रचना विश्लेषण),डेक्सा स्कॅन युनिट,आधुनिक बेरियाट्रिक शस्त्रक्रिया सुविधा आणि ॲल्युरियन गॅस्ट्रीक बलूनसारख्या विना शस्त्रक्रिया लठ्ठपणा प्रक्रिया, रोबोटिक्ससह आधुनिक बेरियाट्रिक शस्त्रक्रिया सुविधा यांसारख्या प्रगत निदान व उपचार सुविधा आहेत. वजन कमी करण्यासाठी इंजेक्टेबल मेडिकल थेरपीज उपचारांमध्ये प्रणेते म्हणून या केंद्रामध्ये अनुभवी बेरियाट्रिक फिजिशियन समाविष्ट असतील.वजन कमी झाल्यानंतर अतिरिक्त त्वचा,चरबी काढून टाकण्यासाठी व शरीराचे सौंदर्य राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया व विनाशस्त्रक्रिया उपचार देखील एकाच छताखाली उपलब्ध असतील. रूग्णांच्या अधिक सुरक्षिततेकरिता या सुविधेमध्ये ॲडव्हान्स्ड बेरियाट्रिक ऑपरेटिंग टेबल देखील येथे उपलब्ध आहे.
या बहुशाखीय टीममध्ये बेरियाट्रिक फिजिशियन डॉ.रीमा काशिवा,बेरियाट्रिक शल्यचिकित्सक डॉ.परमेश्वर बांब्रुले,प्लास्टिक सर्जन डॉ.रवी स्वामीनाथन,बेरियाट्रिक क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट डॉ.सारिका सातव,आहारतज्ञ डॉ.अक्षय पवार,लाईफस्टाईल एज्युकेटर डॉ.रेश्मा कांगुडे,फिजिओथेरपीस्ट डॉ.भूपेंद्र गुप्ता,एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ.सुहास खैरे आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ.शीतल हरपळे यांचा समावेश आहे.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ओबेसिटी,मेटाबोलिक डिसीजेस ॲन्ड ॲडव्हान्स्ड बेरियाट्रिक सायन्सेसच्या संचालिका डॉ.रीमा काशिवा म्हणाल्या की, लठ्ठपणावर उपचार न केल्यास मधुमेह,उच्च रक्तदाब,हृदयरोग,चयापचयाचे विकार आणि इतर अनेक गुंतागुंत होऊ शकतात. लवकर निदान आणि शास्त्रीय उपचार हे या गुंतागुंतींची जोखीम लक्षणीयरित्या कमी करू शकतात आणि जीवनमान उंचावू शकतात.
लठ्ठपणाच्या मुळाशी जाऊन प्रत्येक टप्प्यावर शास्त्रीय व्यवस्थापन करत उपचार महत्त्वाचे
तज्ञांच्या मते, अनेक वर्षे लठ्ठपणाशी संबंधित गुंतागुंतींवर आपण उपचार करत आलो आहोत,मात्र लठ्ठपणाच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे आहे.लठ्ठपणाला आता वैद्यकीय स्थिती म्हणून ओळख मिळाली आहे. यावर उपलब्ध असलेल्या प्रगत उपचारांद्वारे लवकर निदान आणि उपचार करत संबंधित गुंतागुंतीची जोखीम करणे शक्य आहे.वजन कमी करण्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.लठ्ठपणाच्या बाबतीत बहुविद्याशाखीय टीमच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली शास्त्रीय उपचार ही काळाची गरज आहे.
अनेक लोकांना औषधांच्या दुष्परिणामांविषयी भीती असते,परंतु याबाबतीत वैद्यकीय देखरेखीखाली औषधे घेतल्यास हे दुष्परिणाम आटोक्यात ठेवणे शक्य आहे.लठ्ठपणाची जोखीम आणि वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या औषधांनी भविष्यामधील चांगले जीवनमान आणि कमी गुंतागुंत याची तुलना करून विचार केला पाहिजे.
लठ्ठपणावर उपचार केला जाऊ शकतो याबद्दल अधिकधिक जनजागृती निर्माण करणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.ज्या लोकांचा बीएमआय 30 पेक्षा अधिक आहे किंवा सहव्याधी असलेल्या ज्या लोकांचा बीएमआय 27 पेक्षा अधिक आहे,त्यांनी योग्य वेळेत वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याची अपेक्षा आहे.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे समुह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे म्हणाले की,खाण्याच्या चुकीच्या सवयी,अतिपोषण,बैठी जीवनशैली आणि ताणतणावामुळे प्रौढ तसेच छोट्या मुलांमध्ये देखील लठ्ठपणात वाढ होताना दिसत आहे. लवकर निदान आणि प्रभावी लठ्ठपणा व्यवस्थापनामुळे भविष्यातील अनेक संभाव्य आजारांचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, लठ्ठपणा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला शस्त्रक्रियेची गरज असेलच असे नाही.उत्कृष्टता केंद्रामध्ये बीएमआय,बीसीए आणि कोमॉर्बिडीटी असेसमेंट केली जाते.प्रथमत: विना शस्त्रक्रिया पर्यायांचा विचार केला जातो.टाईप 2 मधुमेह,ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप ॲप्निआ,उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या धोक्यांचे सक्रीयपणे एकाच छताखाली मूल्यांकन केले जाते.उपचारांच्या टप्प्यापासून ते उपचारांनंतर पाठपुराव्याच्या टप्प्यापर्यंत तज्ञांच्या टीमकडून योग्य उपचार प्रदान करणे व दीर्घकालीन आरोग्य जपणे हे आमचे उद्दिष्ट आहे.या उपक्रमासह नोबल हॉस्पिटल रुग्णांसाठी प्रगत उपचार आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेसाठी आपली वचनबध्दता अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की,लठ्ठपणा हा गुंतागुंतीचा आणि बहुआयामी आजार आहे,म्हणून एकच किंवा वेगवेगळ्या तज्ञांकडे जाऊन मार्गदर्शन घेण्यापेक्षा एकाच छताखाली एक समर्पित टीम जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या गरजांनुसार उपचाराची दिशा एकत्रित ठरवतात,तेव्हा अधिक चांगले व प्रभावी परिणाम मिळू शकतात. या केंद्राच्या माध्यमातून एकात्मिक उपचार,प्रगत तंत्रज्ञानासह रूग्णाच्या कल्याणासाठी लठ्ठपणा उपचारामध्ये परिवर्तन आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.





