सायबर सुरक्षेसाठी सूर्यभारत–‘माईल-टू’ करार; ‘सूर्यदत्त’मध्ये राज्यातील पहिले अधिकृत केंद्र, ९–१० मार्चला हॅकफेस्ट

By: Editor_Manas

On: Friday, February 27, 2026 6:27 AM

Google News
Follow Us

पुणे: सायबर गुन्हेगारीचा वाढता धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने सायबर सुरक्षा प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज संचालित सूर्यभारत ग्लोबल प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि अमेरिकेतील ‘माईल टू’ यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत ‘सूर्यदत्त मिशन – सायबर फॉर ऑल’ उपक्रमाद्वारे बेसिक ते अतिप्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पीवायसी जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याविषयी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व ‘माईल टू’चे प्रमुख डॉ. रेमंड फ्रेडमन (ऑनलाईन) आणि एशिया हेड अरिंदम पॉल यांनी केली. तसेच या सामंजस्य कराराचे आदानप्रदान केले. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, संगणक विभागाच्या संचालक प्रा. डॉ. मनीषा कुंभार, जनसंपर्क व्यवस्थापक स्वप्नाली कोगजे आदी उपस्थित होत्या.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय, तसेच सायबर गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजनांची माहिती सर्वांना असणे गरजेची आहे. जागतिक दर्जाचे प्रशिक्षण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी हे पाऊल महत्वाचे आहे. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये या ग्लोबल सायबर सिक्युरीटी सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्यात येत असून, समुपदेशन व मार्गदर्शन केले जाणार आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान कौशल्ये आणि एआय कौशल्यसंबंधित बेसिक ते प्रगत प्रशिक्षण असे ३० पेक्षा अधिक अभ्यासक्रम शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कोणत्याही विद्याशाखेचा विद्यार्थी त्यासाठी प्रवेश परीक्षा देऊ शकतो. यशस्वी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी, प्लेसमेंट सपोर्ट दिला जाणार आहे.”

डाॅ. रेमंड फ्रेडमन म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत सायबर क्राईम आणि सायबर फ्राॅड्समध्येही लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. मोबाईल, इंटरनेट वापरणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, समाजाचे सर्व स्तर सायबर गुन्हेगारी किंवा सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत. सध्या सायबर सुरक्षेचा मुद्दा जागतिक पातळीवर चर्चेत आहे. ‘माईल टू’च्या माध्यमातून जगभरातील विविध ठिकाणची स्थानिक सरकारे, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सायबर सुरक्षेशी संबंधित विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ‘सूर्यदत्त’ संस्थेसोबत पुण्यात महाराष्ट्रातील पहिलेच सायबर सुरक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करीत आहोत.”

प्रा. डाॅ. मनीषा कुंभार म्हणाल्या, “क्लाऊड, डेटा, वेब या सर्वच ठिकाणी सायबर सुरक्षा तज्ज्ञांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, प्रत्यक्षात या क्षेत्रात अतिकुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. नव्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे ही कमतरता भरून निघेल, असा विश्वास आहे.”

अरिंदम पॉल यांनी संस्थेच्या भारतातील विस्ताराची माहिती दिली. जागतिक पातळीवर ‘माईल टू’ ३५ अभ्यासक्रम चालविते. भारतामध्ये आम्ही २७ शिक्षणसंस्थासोबत थेट सहभागी असून, २८ ठिकाणी प्रशिक्षण भागीदार म्हणून कार्यरत आहोत. या सर्व ठिकाणी सध्या सायबर सिक्युरिटीचे १४ प्रकारचे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू आहेत, असे ते म्हणाले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now