आध्यात्मिक आणि राष्ट्रीय चेतना जागवणारा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !

आध्यात्मिक आणि राष्ट्रीय चेतना जागवणारा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !

     प्रस्तावना : सध्या भारतासह विश्वभरात युद्धज्वर वाढत आहे. जागतिक वातावरण इतके अस्थिर आहे की, तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी कधी पडेल, ते सांगता येत नाही. अशा वेळी सनातन राष्ट्र म्हणून भारताची विजयीपताका सर्वत्र फडकावी, तसेच भारताच्या ऊर्जेचे केंद्र असलेली सनातन शक्ती बळकट व्हावी, यांसाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा भव्य सोहळा पार पडला. या सोहळ्याला भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक सनातन धर्मप्रेमी उपस्थित होते. यामध्ये संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ नेते, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, साधक, धर्मप्रेमी, भाविक यांचा समावेश होता. देश-विदेशांतून अडीच लाख जणांनी हा कार्यक्रम ‘लाईव्ह’ पाहिला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणार्‍या या महोत्सवाने रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र निर्मितीच्या संकल्पाला आध्यात्मिक बळ दिले. त्यामुळेच हा महोत्सव म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या मार्गातील मैलाचा दगडच म्हणावा लागेल.

महोत्सवाचे केंद्रबिंदु असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून वैयक्तिक उपासनेसह म्हणजेच व्यष्टी साधनेसह समष्टी साधना करण्याचे अर्थात् धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी कृतीशील होण्याचे बोधामृत दिले. महोत्सवामध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष पू. महंत रविंद्र पुरीजी महाराज, अयोध्या हनुमानगढी येथील पू. महंत राजू दास, श्रीक्षेत्र तपोभूमी (गोवा) पिठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत, माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर, भाग्यनगरचे आमदार टी. राजा सिंह, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. संत-महंत, विचारवंत, हिंदुत्वनिष्ठ नेते यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून सनातन राष्ट्र स्थापनेसाठी केवळ वैचारिक दिशा दिली, असे नाही, तर उपस्थित प्रत्येकाला त्यासाठी कृतीप्रवण केले. या वेळी समर्पित भावाने राष्ट्र-धर्म कार्य करणार्‍या २५ लढवय्यांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सनातन संस्कृती धर्मरक्षणासाठी शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचा पुरस्कार करते. त्याचा उद्घोष या महोत्सवात करण्यात आला.

*महोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे :

ब्राह्मतेजाचे अवतरण :  १२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम असलले सोमनाथ शिवलिंग क्रूरकर्मा महंमद गझनी यांनी उद्ध्वस्त केले होते; मात्र काही श्रद्धावान पुजार्‍यांनी त्या भग्नावस्थेतील शिवलिंगाच्या अवशेषांतील काही अंश अत्यंत गुप्ततेने सुरक्षित ठेवले. १००० वर्षांपूर्वीच्या शिवलिंगाचे हे दिव्य अंश महोत्सवाचे एक आकर्षण ठरले. याशिवाय संतपरंपरेतील समर्थ रामदास स्वामी, प.पू. गोंदवलेकर महाराज, प.पू. ब्रह्मानंद महाराज, प.पू. गगनगिरी महाराज, कानिफनाथ महाराज आदी १५ संतांच्या पादुका महोत्सवस्थळी विराजमान होत्या. एकाच वेळी एकाच ठिकाणी इतक्या संख्येने संतांच्या पादुका असणे, ही एक दुर्मिळ घटना आहे.

या जोडीला रामराज्याच्या निर्मितीसाठी करण्यात आलेला १ कोटी सामूहिक रामनाम जपयज्ञ, महाधन्वंतरी याग, सनातन धर्मध्वजाचे आरोहण ही या महोत्सवाची आध्यात्मिक वैशिष्ट्य होती.

सांस्कृतिक खजिना : या वेळी राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांनी ‘युद्धाय कृतनिश्चयः’ हे कीर्तन सादर केले. अधर्माविरुद्ध लढण्याची वेळ आली असून धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी प्रत्येकाने कृतीप्रवण व्हायला हवे, हाच या कीर्तनाचा संदेश होता. या जोडीला महोत्सवामध्ये गायन आणि नृत्य कलेच्या माध्यमातून गुरुसंकीर्तन करण्यात आले.

धुवांधार पावसातही पार पडला शतचंडी याग : महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी  महाधन्वंतरी यज्ञ पार पडल्यानंतर. भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय व्हावा, यासाठी शतचंडी यज्ञ होणार होता. मात्र त्याच दिवशी गोव्यात धुवांधार पाऊसाला सुरूवात झाली. मैदानावर गुडघाभर पाणी साचले होते. मात्र ज्या मुख्य मंडपात शतचंडी याग चालू होता. त्या परिसरात पावसाचा एक थंब पाणी आत आले नाही. शतचंडी यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला.

क्षात्रतेजाचे जागरण : शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. या प्रदर्शनात धर्मवीर संभाजी महाराजांना औरंगजेबाने बंदिस्त करताना वापरलेले मूळ साखळदंड, सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांचे चिलखत, कोल्हापूरच्या सव्यासाची गुरुकुलम आणि पुण्याच्या शिवाई संस्थान यांचे शस्त्रप्रदर्शन, गोव्यातील सौंदेकर घराण्याची प्राचीन शस्त्रे या ऐतिहासिक शस्त्रांचा समावेश होता.

या जोडीला महोत्सवातही शिवकालीन युद्धकलांची आणि स्वसंरक्षणाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आजच्या काळात, जेथे कट्टरपंथी आतंकवादी भारतावर आक्रमणे करत आहेत, तेथे शिवछत्रपतींच्या रणकौशल्याचा आणि शौर्याचा आदर्श ‘सनातन राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी बळ देणारा ठरला.

आध्यात्मिक पर्यटनाला चालना : या महोत्सवासाठी आलेल्या सनातनप्रेमींनी या निमित्ताने गोव्यातील मंदिरे, ऐतिहासिक स्थळे यांना भेटी दिल्याने गोव्यातील आध्यात्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. देश-विदेशांतून आलेल्या मान्यवरांवर गोवा ही ‘भोगभूमी’ नसून ती ‘योगभूमी’ आहे, हे ठसवण्यात या महोत्सवामुळे मोठे यश मिळाले,

थोडक्यात, सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा देशस्तरावर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतना जागवणारा ठरला. साधना, शौर्य आणि देशभक्ती या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला हा महोत्सव, उपस्थितांमध्ये भारताला हिंदू राष्ट्र म्हणून पुनःप्रतिष्ठित करण्याचा ठाम संकल्प जागृत करणारा ठरला. हा शंखनाद म्हणजे हिंदूंना आत्मविश्वास आणि दिशा रणघोष ठरला. महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर ‘पांचजन्य’ शंख फुंकून युद्धाला प्रारंभ केला आणि अधर्माचा नाश होऊन धर्माचा विजय झाला. शंख हा विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानला जातो. पवित्र परशुराम भूमीत झालेला हा शंखनाद सनातन संस्कृतीच्या विजयपथाचा शुभारंभ ठरेल, हे निश्चित !

– श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था. (संपर्क : ९९८७९ २२२२२)