पुणे : ‘तेर पॉलिसी सेंटर’ या पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या संस्थेच्या वतीने रविवार,दि.२ जून २०२४ रोजी पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेत ‘तेर एनव्हायरोथॉन २०२४’ या जनजागृती दौडचे आयोजन करण्यात आले आहे.टाटा ब्ल्यू स्कोप स्टिल्स यांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व स्तरावर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा होत आहे.
तेर पॉलिसी सेंटर ही संस्था जंगलनिर्मितीसाठी विशेष प्रयत्नशील आहे.आजवर संस्थेच्या माध्यमातून ४ लाख झाडे भारतात लावून जगवली आहेत.दरवर्षी त्यात वाढ होते.त्यामुळे जितके स्पर्धक सहभागी होतात,त्यासंख्येइतकी आणखी झाडे त्या हंगामात लावून जागवली जातात,हे या एनव्हायरोथॉनचे वैशिष्ट्य आहे.आतापर्यंत ७०० स्पर्धकांनी सहभाग निश्चित केल्याची माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे दिली.
राज्याचे क्रीडा संचालक महादेव कसगावडे,ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डी आयकॉन शांताराम जाधव यांच्यासह टाटा ब्लुस्कॉप स्टीलचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्पर्धा सुरू होईल.या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.जागतिक पर्यावरण दिवस ५ जूनला साजरा केला जातो, त्या निमित्ताने त्याआधीचा सुटीचा वार निवडून रविवार २ जून २०२४ रोजी हा उपक्रम आयोजित केला आहे.गेली दोन वर्ष या मॅरेथॉनमध्ये विलो इंडिया,टाटा मोटर्स,टाटा ऑटो कॉम या कंपन्यांसह राज्यातील विविध भागातून सुमारे २ हजार पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झालेले आहेत.अत्यंत उत्तम प्रतिसादात आणि उत्साही वातावरणात ही स्पर्धा पाषाण येथील पुणे ग्रामीण पोलिस हॉकी मैदान येथे पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेत होणार आहे.या दौड मध्ये सहभागी होण्यासाठी टाऊन स्क्रिप्ट या पोर्टल वर नोंदणी करता येईल.मॅरेथॉन ३,५ आणि १० किलोमीटर अशा स्वरूपात होणार असून त्यामध्ये १२ ते १८ वर्षे,१९ ते ४० वर्षे,४१ ते ५५ आणि ५६ वर्षे व त्या पुढे अशा विविध वयोगटानुसार मॅरेथॉनमध्ये सहभाग घेता येणार आहे.