सिंहगड रस्त्यावर थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या

By: Editor_Pratik

On: Monday, March 16, 2026 3:54 PM

Google News
Follow Us

​धायरी: शहरात कोयता गँग आणि सराईत गुन्हेगारांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर येथे एका १९ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील संतोष हॉल परिसरात थांबला होता. यावेळी दोन ते तीन हल्लेखोर त्या ठिकाणी आले. काही समजण्याच्या आतच त्यांनी आपल्याजवळील लोखंडी हत्याराने करणवर हल्ला चढवला.

​हल्लेखोरांनी करणच्या शरीरावर वर्मी घाव घातल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. सार्वजनिक ठिकाणी भरवस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरात एकच पळापळ झाली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

​प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत करण काशीद आणि आरोपींमध्ये पूर्वीचा वाद होता. याच वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

​”आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील वर्दळीच्या भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026