कृषी पर्यटन विकसित भारताच्या दिशेने टाकलेले पाऊल

पुणे: “युवा पिढीला शेती व्यवसायाशी जोडण्यासाठी, तसेच कृषी आधारित रोजगार निर्मितीसाठी शेतीला कृषी पर्यटनाची जोड द्यायला हवी. कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय असून, विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे,” असे प्रतिपादन पर्यटन संचालनाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केले. कृषी पर्यटनामध्ये येऊ पाहणाऱ्या युवकांसाठी गणेश चप्पलवार यांचे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त (१६ मे) परभन्ना फाउंडेशन व ऍग्रो टुरिझम विश्व यांच्यातर्फे ‘कृषी पर्यटनातील संधी, शासकीय योजना व आर्थिक सहाय्य’ या विषयावर आयोजित परिसंवादात पवार बोलत होत्या. यावेळी वल्लरी प्रकाशनतर्फे गणेश चप्पलवार लिखित ‘कृषी पर्यटन उद्योजकांची यशोगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रसंगी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विसचे संचालक डॉ. महेश ठाकूर, शिल्पा पाठक, प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर, संयोजक गणेश चप्पलवार आदी उपस्थित होते.
परिसंवादामध्ये आनंद कृषी पर्यटन केंद्राचे आनंद शिंदे, मेघ मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे किरण घाटे, सिनाई कृषी पर्यटन केंद्राचे लहू अवताडे आणि आजरा कृषी पर्यटन केंद्राचे जितेंद्र नवार सहभागी झाले. तेजाली शहासने यांनी संचालन केले. मधुबन कृषी पर्यटन (तृणीत कुथे), कल्पतरु कृषी पर्यटन केंद्र (विनोद बेले), मेघमल्हार कृषी पर्यटन केंद्र (कालिदास इंगवले), आजरा कृषी पर्यटन (जितेंद्र नवार), ओमकार कृषी पर्यटन (गणेश उत्तेकर), नंदग्राम कृषी व गौ पर्यटन केंद्र (अभिलाष नागला), असळज कृषी पर्यटन केंद्र (महेश पेजळेकर), नेचर स्टे कृषी केंद्र पर्यटन (भक्ती म्हात्रे), आनंद कृषी पर्यटन केंद्र (आनंद शिंदे), इको व्हिल द फार्म कृषी पर्यटन (ऋतुजा अचलारे), अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र (रमेश जगताप), पराशर कृषी पर्यटन केंद्र (मनोज हाडवळे), सिनाई कृषी पर्यटन केंद्र (लहू अवताडे) यांना ‘कृषी पर्यटन यशोगाथा पुरस्कार २०२४’ने सन्मानित करण्यात आले.
शमा पवार म्हणाल्या, “कृषी पर्यटनातून ग्रामीण भागाचे जीवनमान उंचावत आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. युवा शेतकरी वर्गाला व्यवसायासाठी प्रेरित करण्यास शासन नेहमीच कटिबद्ध आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जसे अनेकांचे मार्गदर्शन लाभते, तसेच कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये उतरू पाहणाऱ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.”
राजेंद्र सरकाळे म्हणाले, “बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी पर्यटनासाठी आवश्यक भांडवल देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा प्रभावी वापर करायला पाहिजे. सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन, विविध प्रकारच्या सवलती त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात. शेतकरी समृद्ध होईल, तेव्हाच आपला देश विकसित होईल.”
डॉ. महेश ठाकूर म्हणाले, “कृषी पर्यटन क्षेत्रातून आपल्या संस्कृतीचा वारसा जपला जात आहे. गावाकडे रोजगार उपलब्ध नसल्याने शहराची लोकसंख्या वाढली आहे. यामुळे आपण आपल्या संस्कृतीपासून दुरावले गेलो आहोत. संस्कृतीचे दर्शन होण्यासाठी कृषी पर्यटनामध्ये नवनवीन प्रयोग करावेत. त्यातून अनेकांना रोजगारही मिळेल.”

गणेश चप्पलवार म्हणाले, “जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम परभन्ना फाउंडेशन अंतर्गत राबवले जातात. कृषी पर्यटनातून व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या यशोगाथा आहेत. त्यांच्या या यशोगाथा अनेकांना प्रेरणादायी ठरतील. कृषी पर्यटनाचा प्रसार व प्रचाराचे हे काम पुढेही सुरु राहील.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी केले. भाग्यश्री वठारे यांनी आभार मानले. के. अभिजीत, सारंग मोकाटे, मनीषा उगले, संतोष इटलावार यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.