रामचंदानी सुपर जायंट्सने पटकविले ‘आसवानी क्रिकेट कप-३’चे विजेतेपद

पुणे : आसवानी क्रिकेट कप (एसीसी) २०२४ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद रामचंदानी सुपर जायंट्स संघाने पटकाविले. पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपर जायंट्स संघाने पिंपरी इंडियन्सवर १६ धावांनी विजय मिळवत ‘एसीसी’च्या सोनेरी करंडकावर आपले नाव कोरले. महिलांच्या डॉजबॉल स्पर्धेत आसवानी रॉयल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स वरुण संघावर विजय मिळवत स्पर्धेचा मुकुट जिंकला. ‘ये है पिंपरी का त्योहार’ चा नादघोष करत सिंधी बांधवानी स्पर्धेचा आनंद लुटला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रामचंदानी सुपर जायंट्सने सलामीवीर हिमांशू (तीन षटकारांसह २४ चेंडूत ३० धावा), कर्णधार करण आसवानी (२० चेंडूत २१ धावा), रौनक बात्रा (१० चेंडूत नाबाद १७ धावा) व हर्ष वाधवानी (९ चेंडूत १४ धावा) यांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर १२ षटकांत ४ बाद ९८ धावा उभारल्या. मनीष नागदेव व दिनेश रिझवानी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

विजयासाठी ९९ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या पिंपरी इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. मात्र, ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने ११.१ षटकांत ८२ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. कर्णधार धीरज मनवानी याने सर्वाधिक १५ धावा केल्या. जितू पहलानी व हरेश रेलवानी यांनी प्रत्येकी १२ धावा केल्या. इंडियन्सचे पाच खेळाडू धावबाद झाले. रौनक बात्रा, करण आसवानी व कमल जेठानी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अष्टपैलू कामगिरी करणारा रौनक बात्रा सामनावीर ठरला.

विजेत्या रामचंदानी सुपर जायंट्स संघाला भव्य सुवर्ण करंडक आणि ५,५५,५५५/- अधिक २,००,०००/- (घनश्याम सुखवानी व सागर सुखवानी) असे एकूण ७,५५,५५५/- , तर उपविजेत्या पिंपरी इंडियन्सला रजत करंडक आणि ३,३३,३३३/- रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. डॉजबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला १,११,१११/- रुपयांचे, तर उपविजेत्या संघाला ५५,५५५/- रुपयांचे रोख बक्षीस व करंडक देण्यात आले. पुरुषांमध्ये मनीष नागदेव (मॅन ऑफ द सिरीज) याला स्कोडा कुशक कार, तर महिलांमध्ये याकृत रांजझानी, सांची दुदानी, दीक्षा खुबचंदानी, मिश्टी तेजवानी, माही चावलानी (डॉजबॉल-वुमेन ऑफ द सिरीज) यांना चेतक स्मार्ट इलेक्ट्रिक स्कुटर देण्यात आले.

स्पर्धेचे प्रमुख संयोजक आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी म्हणाले, “जवळपास महिनाभर क्रिकेट व डॉजबॉल स्पर्धेचा आनंद घेतला. यंदा सिंधी समाजातील महिला आणि मुलींनाही खेळासाठी प्रोत्साहित केले. अतिशय उत्साहात आणि आनंदात ही स्पर्धा पार पडली. सिंधी समाजात खेळाचे महत्व वाढत असून, कुटुंबीय देखील या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. खऱ्या अर्थाने ‘पिंपरी का त्योहार’ या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अनुभवला.”