पुणे : महानगरपालिकेतील आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांचे निलंबन मंत्र्यांच्या दबावामुळे झाले आहे. मात्र, समस्त पुणेकर नागरिक डॉ. पवार यांच्या पाठीशी असून, त्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या वतीने शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी आरोग्य खात्याचा व संबंधित मंत्र्यांचा निषेध करत पुणेकर जनता डॉ. पवार यांच्या पाठीशी असल्याचे बॅनर लावले आहेत. तसेच त्यांच्यावरील कारवाई मागे घेऊन त्यांना तात्काळ सेवेत रुजू करून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप व एका जुन्या तक्रारीला समोर ठेवून पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, डॉ. पवार यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून निलंबनाच्या कारवाईसंदर्भात काही गंभीर खुलासे केले आहेत. एका मंत्र्याने आपल्याला कात्रज येथील त्यांच्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे सांगितली. आरोग्य विषयक उपकरणे व इतर खरेदीत घोटाळा करण्याचा दबाव संबंधित मंत्र्याने टाकला. त्याला प्रतिसाद न दिल्याने सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई केल्याचे डॉ. पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.”