नाशिक : सध्या आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. रोमांचक होणाऱ्या या स्पर्धेत बुधवारी कोलकाता विरुद्ध दिल्ली या सामन्यामध्ये बेटींग लावणाऱ्या संशयितास विशेष पथकाने सट्टेबाजी करताना अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Betting Crime IPL match news)
महेंद्र अशोक वैष्णव (३४, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, लामखेडा मळा, तारवाला नगर, पंचवटी) असे संशयित सट्टेबाजाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषीनगर जॉगिंग ट्रॅकसमोर आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती विशेष पथकाचे अंमलदार दत्तात्रय चकोर यांना मिळाली होती.
त्यानुसार, पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी (ता.३) रात्री संशयित महेंद्र यास रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून मोबाइल, रोकड व कार असा १६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयित महेंद्र हा मोबाइलवर आयपीएल सामना पाहून सट्टा लावत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, चकोर आदींच्या पथकाने बजावली.