सावध… : व्हॉट्सॲप कॉलवरून होतेय फसवणूक, अनेक गुन्हे उघडकीस

नागपूर : मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ‘घंटो का काम मिनिटो मे’ करणारे साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते. परंतु याच मोबाईलच्या गैरवापरातून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. कॉल करून खोटी माहिती देऊन आर्थिक फसवणूक केल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेषता महिला, मुलींनी सावध राहणे गरजेचे आहे.

नरेंद्रनगर येथील राजू चव्हाण यांना दोन दिवसांपूर्वी दुपारी साडेबारा वाजता एक व्हॉट्सॲप कॉल आला. कॉल करणाऱ्याने राजू यांचे संपूर्ण नाव अचूक सांगून त्यांच्या मुलीचे नावसुद्धा सांगून ती तुमची कोण लागते, असा प्रश्न केला.

राजू यांनी मुलगी म्हटल्यावर समोरून त्यांना तुम्ही आता कुठे आहात, असा प्रतिप्रश्न केला. राजू यांनी प्रसंगावधान राखून मी तर घरीच आहे आणि मुलगी माझ्यासोबत आहे, असे सांगताच कॉलवरील व्यक्तीने लगेच फोन कट केला.

त्यानंतर राजू यांनी त्याच मोबाईल क्रमांकावर अनेकदा फोन केला असता त्यांचा कॉल स्वीकारलाच नाही. आपल्यासोबत घडलेला प्रकार कुणाशीही घडू नये किंबहुना घडला तर प्रत्येक जण अशा फसवणुकीला बळी पडू नये यासाठी राजू चव्हाण यांनी याबाबत ‘सकाळ’कडे माहिती दिली.

आपल्या परिचयातील काही जणांना असेच फेक कॉल आल्याचे राजू यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने कुटुंबीयांबद्दल उलटसुटल माहिती दिली तर पॅनिक न होता संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये किंवा आर्थिक व्यवहार करू नये, असा सल्ला सायबर तज्ज्ञ देतात.

‘पोलिसांशी संपर्क साधावा’

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. फेक कॉल प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीने लगेच जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती दिली पाहिजे. संबंधित नंबर नेहमीसाठी ब्लॉक तसेच बंद करण्यासाठी आम्ही एक लिंक तयार केली आहे. ज्यामुळे अशा लोकांना आळा घालता येईल. नागरिकांनी न घाबरता माहिती पोलिसांना दिली पाहिजे, अशी माहिती वरिष्ठ सायबर पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.