BIG NEWS : शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात? लोकसभेच्या जागा वाटपाआधी मोठ्या हालचाली
शिरूर-पुणे | 27 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. अशाच महायुतीमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरु आहे. अशातच महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अतीतातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत ते मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांना लोकसभा निवडणूक लढण्याची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे गरज पडल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्यासही ते तयार आहेत. आढळराव पाटील यांनी 29 फेब्रुवारीला आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी इथं तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, पक्ष अंगीकृत संघटना आणि सर्व शिवसैनिकांची अतितातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते महत्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत महत्त्वाची घोषणाही आढळराव पाटील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद हे राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. प्रदीप कंद जरी सध्या भाजपमध्ये असले तरी अजित पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. शिरूर, हवेली विधानसभा प्रचार प्रमुख म्हणून भाजपमध्ये जबाबदारी आहे. पण जर ते अजित पवार गटात गेले तर त्यांना राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभीची उमेदवारी भेटण्याची शक्यता आहे. अशातच प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाण्याआधीच शिवाजीराव आढळराव पाटील सतर्क झालेत. आढळराव पाटील लवकरच राष्ट्रवादीत जाण्याबाबत निर्णय घेऊ शकतात.
लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून अद्यापपर्यंत शिरूर लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे महायुती इथे कुणाला उमेदवारी देणार? हे पाहणं महत्वाचं असेल.