पुणे, 24 मे 2024 : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळे येथे नॅशनल प्रिन्सिपल कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. भारतभरातील विविध उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 44 प्राचार्य यामध्ये सहभागी झाले होते. शिक्षणाच्या सर्वोत्कृष्ट पद्धती प्रदान करणे, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरी सामायिक करणे, समान समन्वय शोधणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे हे यामागचे उद्दिष्ट होते.यावेळी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी विद्यार्थ्यांमध्ये उच्च रोजगारक्षमता निर्माण करणाऱ्या विद्यापीठाच्या कौशल्यावर आधारित शिक्षण प्रारूपाची माहिती दिली.
या परिषदेमध्ये नवीन काळातील कौशल्ये आणि कार्यक्रम,इंडस्ट्री फर्स्ट ॲप्रोच, एआय डिसरप्शन आणि टूवर्ड्स इंडस्ट्री 5.0 इत्यादी अनेक विषयांवर परिसंवाद आणि चर्चासत्रांचा समावेश होता.
उद्योग तज्ज्ञांनी सहभागींना उच्च विकास क्षेत्राबद्दल सादरीकरण केले. प्राध्यापक, उद्योग भागीदार आणि माजी विद्यार्थ्यांनी चर्चासत्रात सहभागी होऊन आपले विचार आणि अनुभव सांगितले. चर्चासत्रात रोजगारक्षमता, कौशल्यावर आधारित शिक्षण, कौशल्यातील अंतर भरून काढणे, नोकरीतील भूमिका व कामाची व्याप्ती, प्रशिक्षण असे विविध पैलू आणि आव्हाने या विषयांवर परिषदेत चर्चा करण्यात आली.
हा कार्यक्रम सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीच्या दोन कॅम्पसच्या तीन दिवसांच्या भेटीचा भाग होता.यामध्ये सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस, इंदौर यांचा समावेश होता. यामध्ये दिल्ली, कोलकाता, जयपूर, गोरखपूर, पाटणा, लखनौ, हैदराबाद,अहमदाबाद इत्यादी देशभरातून हायस्कूलच्या प्राचार्यानी सहभाग घेतला होता.
उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरण अंतर्भूत करणे या भविष्यातील मार्गाबाबत चर्चा करणाऱ्या कार्यशाळेने परिषदेचा समारोप झाला.