पुणे, ता. २२ : अर्थ मूव्हिंग आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट (बांधकाम उपकरणे) तयार करणारी भारतातील आघाडीची कंपनी जेसीबी इंडियाने पाच लाखावे बांधकाम उपकरण नुकतेच सादर केले. वल्लभगड येथील जेसीबी इंडियाच्या कारखान्यातून हे पाच लाखावे उपकरण बाहेर पडले. यावेळी जेसीबीचे ग्रुप चेअरमन लॉर्ड बॅमफोर्ड उपस्थित होते.
जेसीबी इंडिया कंपनी भारतात १९७९ पासून कार्यरत असून, तिची उत्पादने देशभरात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरली जातात. भारतात जेसीबी इंडिया कंपनीच्या सहा उत्पादन सुविधा असून, तिची “मेड इन इंडिया” उपकरणे १३० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात.
यावेळी लॉर्ड बॅमफोर्ड म्हणाले, “भारत आज जगातील सर्वांत मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. गेल्या दशकभरात पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्षणीय लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारत आता आमच्या जागतिक व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारत आमच्या सर्वांत मोठ्या बाजारपेठांपैकी एक असून, ही बाजारपेठ जेसीबीसाठी जागतिक पुरवठा साखळीतही योगदान देते”
यावेळी जेसीबी इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक शेट्टी म्हणाले, “जेसीबीमधून बाहेर पडणारे पाच लाखावे मशीन टेलिहँडलर हे आहे. हा महत्त्वाचा टप्पा गाठताना हेच उपकरण तयार होणे ही अत्यंत विशेष बाब आहे. हे यंत्र भारतात आणल्यापासून त्याचे उत्कृष्ट डिझाइन आणि अभियांत्रिकीमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षितता आणि उत्पादनक्षमतेला चालना मिळाली आहे. टेलीहँडलर्स निर्मितीत जेसीबी जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. भारताची जसजशी प्रगती होत आहे, तसतशा मटेरियल हँडलिंग क्षेत्रात या यंत्रासाठी आम्हाला अधिकाधिक संधी दिसत आहेत. याशिवाय, बॅकहो लोडर, एक्सकॅव्हेटर्स यासह इतर यंत्रांचाही पायाभूत सुविधा क्षेत्रात वापर वाढले, असा आम्हाला विश्वास आहे. ”
जेसीबी इंडिया भारतात नऊ श्रेणींमध्ये ६० हून अधिक उत्पादने तयार करते. बांधकाम उपकरणे क्षेत्रातील लिंग भेद कमी करण्याबाबत कंपनीने एक आदर्श मापदंड निर्माण केला आहे. जयपूरच्या कारखान्यात ३४ टक्के महिला कर्मचारी आहेत, तर २०२२ मध्ये उद्घाटन झालेल्या वडोदरा केंद्रातील विक्री विभागात जवळपास ५२ टक्के महिला आहेत. कंपनीच्या पुण्यातील डिझाइन सेंटरमध्ये ७०० हून अधिक अभियंते असून, ते देशांतर्गत तसेच जागतिक प्रकल्पांवर काम करतात.