प्रतिनिधी मानस : सणासुदीच्या काळात नागरिकांना आकर्षक आमिष दाखवून सायबर फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून दिवाळीनिमित्त प्रत्येक नागरिकाला केंद्र सरकारकडून ८ हजार रुपये मिळणार असल्याचा बनावट मेसेज सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असून, त्यामागे सायबर गुन्हेगारांचा मोठा डाव असल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून नागरिकांचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम अकाउंट हॅक करण्यासह मोबाईलमधील वैयक्तिक व आर्थिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अहमदाबाद सिटी सायबर क्राइम पोलिसांनी या फसवणुकीबाबत नागरिकांना सतर्क केले असून, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा आणि केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचा उल्लेख असल्याने अनेक नागरिक या संदेशाला खरा समजून फसण्याची शक्यता आहे. मात्र, दिवाळीनिमित्त प्रत्येक नागरिकाला ८ हजार रुपये देण्याची कोणतीही अधिकृत सरकारी योजना असल्याचा आधार नाही.
पाच ग्रुप किंवा २० मित्रांना मेसेज पाठवण्याची अट
सायबर गुन्हेगारांकडून पाठवण्यात येणाऱ्या मेसेजमध्ये दिवाळीचे ८ हजार रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. लिंक उघडल्यानंतर सरकारी योजनेसारखी दिसणारी बनावट वेबसाइट समोर येते. त्यावर संबंधित मोबाईल नंबरची निवड बक्षिसासाठी झाल्याचे दाखवले जाते.
हे बक्षीस मिळवण्यासाठी संबंधित मेसेज व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरील पाच ग्रुपमध्ये अथवा २० मित्रांना पाठवण्याची अट घातली जाते. त्यानंतर मोबाईल क्रमांक विचारला जातो आणि स्क्रीनवर आठ अंकी ‘कनेक्शन कोड’ दाखवला जातो. हा कोड वापरून सायबर भामटे संबंधित व्यक्तीचे व्हॉट्सॲप अकाउंट स्वतःच्या डिव्हाइसशी जोडण्याचा प्रयत्न करतात.
एका कोडमुळे व्हॉट्सॲपचा ताबा सायबर चोरट्यांकडे!
अहमदाबाद सिटी सायबर क्राइम पोलिसांच्या माहितीनुसार, वेबसाइटवर दाखवलेला आठ अंकी कोड व्हॉट्सॲपमधील ‘Linked Devices’ या पर्यायात टाकण्यास सांगितले जाते. नागरिकांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट अनोळखी डिव्हाइसशी जोडले जाऊ शकते. त्यानंतर सायबर गुन्हेगारांना संबंधित अकाउंटचा वापर करण्याची संधी मिळते. अशाच पद्धतीने टेलिग्राम अकाउंटवरही ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एकदा अकाउंटचा ताबा मिळाल्यानंतर भामटे संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना संदेश पाठवून त्यांच्याकडूनही आर्थिक फसवणूक करू शकतात. त्यामुळे केवळ स्वतःचीच नव्हे, तर आपल्या संपर्कातील इतरांचीही आर्थिक सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
APK फाइल डाउनलोड केली तर बँक खात्यालाही धोका
या फसवणुकीचा पुढील टप्पा अधिक धोकादायक आहे. बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी किंवा पैसे हस्तांतरित करण्यासाठी PhonePe सारख्या ॲपचा वापर करण्यास सांगितले जाते. त्यानंतर काही संशयास्पद ॲप्स डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते. या फाइल्स प्रामुख्याने APK स्वरूपात असतात.
अनोळखी स्रोतावरून अशा फाइल्स मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यास त्यामध्ये असलेल्या दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअरमुळे मोबाईलमधील एसएमएस, ओटीपी, बँकिंग ॲप्स आणि वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते. परिणामी बँक खात्यातील रक्कम चोरीला जाण्याची शक्यता असते.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
१. अनोळखी व्यक्ती किंवा वेबसाइटने दिलेला कोड व्हॉट्सॲपच्या ‘Linked Devices’ पर्यायात कधीही टाकू नका. अनोळखी डिव्हाइस लिंक झाल्याचे आढळल्यास ते तातडीने लॉगआउट करा.
२. टेलिग्राममध्ये ‘Two-Step Verification’ सुरू ठेवा. ‘Active Sessions’ तपासून अनोळखी डिव्हाइसची नोंद हटवा.
३. व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामचा ओटीपी, लॉगिन कोड आणि पासवर्ड कोणालाही देऊ नका.
४. अनोळखी लिंकवरून APK फाइल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका. ॲप्स डाउनलोड करण्यासाठी अधिकृत Google Play Store चाच वापर करा.
५. मोबाईलवर संशयास्पद फाइल डाउनलोड झाल्याची सूचना आल्यास ती उघडू नका किंवा इन्स्टॉल करू नका.
६. कोणत्याही सरकारी योजनेच्या नावाने आर्थिक लाभाचे आमिष दाखवले जात असल्यास संबंधित माहिती अधिकृत सरकारी संकेतस्थळावर तपासा.
लक्षात ठेवा : मोफत आर्थिक लाभाचे आमिष दाखवणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवू नका. एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचे सोशल मीडिया अकाउंट, वैयक्तिक माहिती आणि बँक खात्यातील पैसे धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.





