प्रतिनिधी मानस : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील व काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास कोल्हापुरातून सतेज पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवून त्यांचा पराभव करेन, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एबीपी माझाच्या ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. सतेज पाटील यांच्या आव्हानाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण पक्षाच्या आदेशानुसार काम करणारे कार्यकर्ते आहोत. पक्ष जिथे पाठवेल तिथे निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत.
“सतेज पाटील मला सांगणारे कोण? माझा पक्ष मला जिथे पाठवेल तिथे मी जाईन. माझे पाकीट कोरे आहे, पक्षाने त्यावर पत्ता टाकावा, मी तिथे जाण्यास तयार आहे. अमित शाह यांनी पुण्यातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मी पुण्यातून निवडणूक लढवली आणि जिंकलो. त्यामुळे पक्षाचा आदेश माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास मी सतेज पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवेन आणि त्यांना हरवेन,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सतेज पाटील यांचे राजकीय साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर सतेज पाटील यांनी सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून कोल्हापुरातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे खुले आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पक्षाच्या आदेशानुसार आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.
गोकुळच्या निर्णयाचे समर्थन; चार संचालकांना मताधिकार नाकारण्यामागे संस्थेचे हित
दरम्यान, गोकुळ दूध संघातील शासननियुक्त चार संचालकांच्या मताधिकाराचा मुद्दाही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केला. गोकुळमध्ये आपल्या पक्षाचा अध्यक्ष निवडून आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. उलट, संस्थेचे कामकाज सुरळीत सुरू राहावे आणि गोकुळचे हित जपले जावे, यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
“५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या आणि शासनाकडून जमीन व आर्थिक मदत मिळालेल्या संस्थांमध्ये सरकारी हितसंबंध जपणे आवश्यक आहे. शासननियुक्त संचालकांना मताधिकार नसेल तर सरकारच्या हिताचे प्रतिनिधित्व कसे होणार? देशभरात नामनिर्देशित सदस्यांना मताधिकार दिला जातो. गोकुळचा अध्यक्ष आमचा व्हावा म्हणून आम्ही काहीही केलेले नाही. सलग तीन बैठकांमध्ये कोरम पूर्ण झाला नसता, तर सर्व २५ संचालकांना घरी जावे लागले असते. त्यामुळे संस्थेच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला वाद आता चंद्रकांत पाटील विरुद्ध सतेज पाटील अशा राजकीय संघर्षाचे स्वरूप धारण करत आहे. आगामी काळात या दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.





