प्रतिनिधी मानस : दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव करून देणारी दुर्दैवी घटना ओतूरजवळील उदापूर येथे घडली आहे. गुरुवारी अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर उदापूर गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात ओंकार दिनकर अमूप या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अपघातात ओंकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यांनी हेल्मेट परिधान केले असते, तर डोक्याला होणारी गंभीर दुखापत टळून जीव वाचण्याची शक्यता असती, अशी चर्चा होत आहे. या घटनेने हेल्मेट वापरण्याबाबत तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
अनेक दुचाकीस्वारांकडे हेल्मेट असते; मात्र ते नियमितपणे वापरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. काहींना हेल्मेटमुळे गैरसोय वाटते, तर काही जण वाहन चालविण्याच्या कौशल्यावर अतिआत्मविश्वास ठेवतात. मात्र, रस्त्यावरील अपघात कोणतीही पूर्वसूचना देऊन होत नाहीत. समोरून येणाऱ्या वाहनाची चूक, अचानक उद्भवणारी परिस्थिती किंवा वाहनावरील नियंत्रण सुटणे यामुळे क्षणार्धात गंभीर दुर्घटना घडू शकते.
हेल्मेटमुळे अपघात टाळता येत नसला, तरी अपघाताच्या वेळी डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी करण्यास मदत होते. त्यामुळे दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीनेच नव्हे, तर मागे बसणाऱ्या प्रवाशानेही दर्जेदार आणि योग्य आकाराचे हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. हेल्मेटचा पट्टा व्यवस्थित लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याशिवाय वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे गरजेचे आहे.
घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे, याचे भान ठेवा!
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी सर्व वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. घरात आपली कोणीतरी वाट पाहत आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवावे. दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा. हेल्मेटमुळे गंभीर अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वारांचे प्राण वाचल्याची उदाहरणे आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वैष्णवी ठिकेकर यांनी सांगितले की, ओंकार अमूप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यांनी हेल्मेट वापरले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता होती.
ओंकार यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका तरुणाचा जीव गेल्यानंतर तरी इतरांनी या घटनेतून धडा घेणे आवश्यक आहे. दुचाकीवरून घराबाहेर पडताना हेल्मेट डोक्यावर असू द्या. कारण तुमची वाट केवळ तुम्ही पाहत नाही, तर तुमचे आई-वडील, पत्नी, मुले आणि कुटुंबीयही पाहत असतात.
लक्षात ठेवा, हेल्मेट गाडीच्या हँडलला अडकवण्यासाठी नाही, तर स्वतःचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहे!





