प्रतिनिधी मानस : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा रंगत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आगामी पुणे दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या दौऱ्यात भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना अधिक महत्त्व मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित मॅरेथॉनच्या उद्घाटनाला अमित शहा उपस्थित राहणार नसल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
अमित शहा रविवार, १५ नोव्हेंबर आणि सोमवार, १६ नोव्हेंबर असे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. मात्र, या दौऱ्यात पुणे शहरात त्यांचा कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम नियोजित नसल्याचे समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी शहा उपस्थित राहणार असल्याची चर्चा यापूर्वी होती. त्यानुसार मोहोळ यांच्या वतीने शहरात होर्डिंग्ज लावून या कार्यक्रमाची जाहिरातही करण्यात आली होती. मात्र, शहा रविवारी दुपारी पुण्यात दाखल होणार असल्याने ते मॅरेथॉनच्या उद्घाटनाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. खासदार पार्थ पवार यांनी १३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेत भेट देऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध नेत्यांच्या वक्तव्यांमुळे या चर्चेला अधिक बळ मिळत असतानाच अमित शहा यांचा पुणे दौरा होत आहे. त्यामुळे या दौऱ्याला केवळ औपचारिक भेटीपुरते मर्यादित न ठेवता राजकीयदृष्ट्याही महत्त्व दिले जात आहे.
विशेष म्हणजे, रविवारी संध्याकाळपासून सोमवार सकाळपर्यंत अमित शहा यांचा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नियोजित नसल्याची माहिती आहे. या कालावधीत महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बंदिस्त बैठकांमधून कोणते राजकीय संकेत मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून तळेगावच्या कार्यक्रमाचे नियोजन
दरम्यान, अमित शहा यांच्या पुणे शहरातील कार्यक्रमांबाबत भाजपकडूनही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पुणे शहरात शहा यांचा मोठा कार्यक्रम नसल्याने तळेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीचे नियोजन सुरू असल्याचे भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.
अमित शहा यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांचे स्वरूप, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना मिळणारे महत्त्व आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेची पार्श्वभूमी पाहता, हा दौरा राज्याच्या आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.





