प्रतिनिधी मानस : समृद्धी महामार्गावर भरधाव कंटेनरने सुमारे १५ ते २० वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले. अपघाताची गंभीरता लक्षात घेऊन माजी मंत्री राजेश टोपे यांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेत जखमी प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले.
राजेश टोपे हे नागपूरहून जालन्याकडे समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत होते. यावेळी महामार्गावर झालेल्या अपघातामुळे अनेक वाहने रस्त्यावर थांबलेली होती. त्याचदरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने या वाहनांना जोरदार धडक दिली. कंटेनरच्या धडकेमुळे सुमारे १५ ते २० वाहनांचे नुकसान झाले असून, अनेक प्रवासी जखमी झाले.
अपघाताचे गांभीर्य लक्षात येताच राजेश टोपे यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमी नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर वारंवार घडणारे अपघात ही चिंतेची बाब बनली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा दुर्घटना रोखण्यासाठी शासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महामार्गावरील वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करणे, वेगमर्यादेची कठोर अंमलबजावणी करणे, आपत्कालीन मदत यंत्रणा तत्पर ठेवणे तसेच अपघातप्रवण ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.





