पुणे : माहेरहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्याच्या मागणीवरून छळ झाल्याच्या आरोपानंतर अभियंता पायल अक्षय झांबरे (वय ३४) हिने आत्महत्या केल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पायलचे पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीसह सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या आज, गुरुवार (दि. ५ नोव्हेंबर) रोजी दुपारी ठीक १२.३० वाजता खेडशिवापूर येथील पायल पवार झांबरे यांच्या घरी भेट देणार आहेत. यावेळी त्या पायल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
पायलच्या आत्महत्येनंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी न्यायालयाबाहेर आंदोलन करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महिलांवरील अन्याय, कौटुंबिक छळ आणि हुंडाबळीच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या तृप्ती देसाई या पायलच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर कोणती भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





