छत्रपती संभाजीनगर : आयफोन आणि त्याच्या हफ्तांवरून झालेल्या वादातून छत्रपती संभाजीनगरातील चांदगुडे कुटुंब संपलं. वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून दरी उडी घेऊन कुटुंबानं स्वत:ची अखेर करून घेतली. आयफोनवरून सुरू असलेल्या वादानं कुटुंबाची अखेर झाली. या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली.
कुणाल चांदगुडे, त्याची आई संगीता आणि वडील मुरलीधर चांदगुडे यांच्या मृत्यूनं नातेवाईकांना धक्का बसला आहे. १९ वर्षीय कुणाल खवड्या डोंगरावर जीव देण्यासाठी गेला होता. आयफोनच्या हफ्त्यांवरून त्याचा वडिलांसोबत वाद झाला. त्यानंतर तो डोंगरावर आयुष्याचा शेवट करून घेण्यासाठी पोहोचला. वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी हात पुढे केला. याच सुमारास दोघे खाली पडले. पती आणि लेकाला डोळ्यांदेखत पडताना पाहून संगीता यांनीही डोंगरावरून उडी घेतली.
चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतर आता घरात केवळ त्यांचा शेरू कुत्राच राहिला आहे. तो कालपासून त्याच्या माणसांची वाट पाहत आहे. कुणाल आणि शेरू यांच्यात विशेष जिव्हाळा होता. कुणाल शेरूला घेऊन रोज सकाळी फिरायला जायचा. तोच कुणाल दिसत नसल्यानं शेरू अस्वस्थ झाला आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून शेरू केवळ जोरजोरात भुंकतोय. पण तो नीटसं काही खात-पित नाही. शेरू व्यवस्थित झोपलेला नाही. दररोज आसपास दिसणाऱ्या माणसांना त्याची नजर शोधते आहे.
शेरूचा कुटुंबाच्या तिन्ही सदस्यांवर विशेष जीव होता. तिन्ही सदस्यांच्या अकाली मृत्यूनंतर शेरू एकटा पडला आहे. शेरूला बंद घरातून बाहेर काढून त्याची काहीतरी व्यवस्था करावी, अशी मागणी शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे.
संगीता चांदगुडे यांच्या वडिलांनीदेखील शेरूबद्दल चिंता व्यक्त केली. ‘आम्ही घरात दोनच व्यक्ती राहतो. आम्ही नवरा बायको दोघं वयस्कर आहोत. माझं ७४ वर्षे वय आहे. माझं २० बाय ३० चं घर आहे. शेरूला सांभाळावं अशी आमची इच्छा आहे. मात्र वयामुळे आम्हाला सांभाळता होणार नाही. यामुळे श्वानप्रेमी किंवा एखाद्या संस्थेने या लाडक्या शेरूला दत्तक घेतलं तर आम्ही त्याला दत्तक द्यायला तयार आहोत, असं त्यांनी सांगितलं.





