येरवड्यातील जबरी चोरीचा छडा; सराईत गुन्हेगारांना बेड्या; वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ८७ सीसीटीव्हींची तपासणी; ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

By: Editor_Pratik

On: Saturday, August 22, 2026 2:38 PM

Google News
Follow Us

पुणे : कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरसमोर एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळासह परिसरातील तब्बल ८७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. या कारवाईत आरोपींकडून फिर्यादीच्या नावाचे आधारकार्ड, १० हजार रुपये रोख आणि सुमारे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी हे ट्रम्प टॉवर, कल्याणीनगरसमोर फोनवर बोलत उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडविले. ‘रागाने का पाहतोस?’ असे म्हणत आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या खिशातील सुमारे १५ हजार १०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांकडून आरोपींना तातडीने जेरबंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनिकांत आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर यांनीही तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या.

८७ सीसीटीव्हींचा बारकाईने तपास

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार साईनाथ म्हस्के आणि अनिल मन्हाळकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळ आणि परिसरातील तब्बल ८७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. आरोपींच्या हालचाली, दुचाकी आणि त्यांच्या मार्गाचा मागोवा घेण्यात आला. त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हे हडपसर परिसरात राहत असल्याचे समोर आले.

दोघेही हडपसर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेऊन हडपसर पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

२७ गंभीर गुन्ह्यांचा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे निखील ऊर्फ दाद्या शशिकांत कांबळे (वय २६, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) आणि अयान नासीर शेख (वय २२, रा. गल्ली क्रमांक १९, सय्यदनगर, हडपसर) अशी आहेत.

पोलिसांनी कल्याणीनगर येथील जबरी चोरीबाबत चौकशी केली असता आरोपींनी एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील रोख रक्कम चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील निखील ऊर्फ दाद्या कांबळे हा चोरी आणि जबरी चोरीतील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यासह पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल २७ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अयान शेख याच्यावरही चार गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

६० हजारांचा मुद्देमाल जप्त

आरोपींना येरवडा पोलीस ठाण्यात आणून दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून फिर्यादीच्या नावाचे आधारकार्ड, १० हजार रुपये रोख आणि एमएच १२ वायव्ही ७७३५ क्रमांकाची सुमारे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी, असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत.

गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची कामगिरी

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे तसेच पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, बालाजी सोगे, गणेश पालवे, संदीप जायभाय, नटराज सुतार आणि सोमनाथ गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सीसीटीव्ही तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा प्रभावी वापर करून अल्पावधीत सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात येरवडा पोलिसांना यश आले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now