सत्ताधाऱ्यांच्या दोषांवर बोट ठेवणाऱ्यांना ‘दिमागी नक्षल’ म्हणणे ही सत्तालोलुप स्वार्थी मानसिकता
पुणे, दि. १८ ऑगस्ट : सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारे, त्यांच्या दोषांवर बोट ठेवणारे आणि देशातील विद्यार्थी, तरुण, शेतकरी व छोट्या उद्योजकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे नागरिक राष्ट्रद्रोही नसून राष्ट्रहितैषी आहेत. अशा व्यक्तींना ‘दिमागी नक्षल’ म्हणून संबोधणे ही सत्तालोलुप आणि स्वार्थी मानसिकतेचे द्योतक आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
भारत ही लोकशाहीची जननी असल्याचा जगभर डंका पिटणारे भाजपचे शीर्ष नेतृत्व किती दुटप्पी, स्वार्थी आणि ढोंगी आहे, हे पंतप्रधानांच्या अलीकडील वक्तव्यांवरून स्पष्ट झाले आहे. देशातील विद्यार्थी व तरुणांच्या भवितव्याचा तसेच देशहिताचा विचार करणारे राजकीय नेते, नागरी समाजातील सदस्य आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कार्यरत सामाजिक चळवळींतील घटक सत्ताधाऱ्यांना नकोसे झाले आहेत. अशा सर्वांना ‘दिमागी नक्षल’ म्हणून हिणवणे हा लाल किल्ल्यावरून लोकशाहीवर केलेला आघात आहे, असे तिवारी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि घटनात्मक पदाची गरिमा जपण्याची जबाबदारी असताना विरोधी विचार मांडणाऱ्यांना अशा प्रकारे हिणवले जाईल, असे वाटले नव्हते, असेही तिवारी यांनी नमूद केले. केवळ निवडणूककेंद्री राजकारण आणि सत्ताप्राप्तीवर भर देऊन लोकशाहीतील स्वायत्त संस्थांचा वापर केला जात असल्याने विद्यार्थी, तरुण, शेतकरी आणि छोट्या उद्योजकांच्या हितासाठी विविध स्तरांवर आवाज उठवला जात आहे. हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
“मोदींच्या व्याख्येनुसार ‘दिमागी नक्षल’ नक्की कोण?” असा सवाल उपस्थित करत तिवारी म्हणाले की, नक्षलवाद हा हिंसक आणि राष्ट्रविरोधी प्रवृत्तीशी संबंधित आहे. मात्र घटनात्मक चौकटीत राहून सरकारला प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना त्याच चौकटीत बसवणे चुकीचे आहे. सत्तालोलुपतेतून लोकशाहीवर हुकूमशाहीचे सावट आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांना प्रश्न न विचारणारे, अन्यायाविरोधात आवाज न उठवणारे आणि गप्प बसणारे नागरिकच अपेक्षित आहेत का, असा सवालही तिवारी यांनी केला. भारतात लोकशाही आहे आणि प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र विचार करण्याचा तसेच संविधानाच्या चौकटीत आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, हे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी संसद भवनाच्या पायरीवर नतमस्तक होऊन संसदीय लोकशाहीबद्दल आदर व्यक्त केला; मात्र संसदेसमोर घटनात्मक उत्तरदायित्व पार पाडण्याच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संविधानासमोर नतमस्तक होण्याबरोबरच संविधानातील मूल्यांचे रक्षण करणेही तितकेच आवश्यक आहे. नागरिकांना केंद्रबिंदू मानत असल्याचे सांगताना त्यांच्या घटनात्मक अधिकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब असल्याचे तिवारी यांनी म्हटले.
राहुल गांधी २२ ऑगस्ट रोजी पुण्यात
देशातील लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असताना विद्यार्थी व तरुणाईचे भवितव्य सावरण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे २२ ऑगस्ट रोजी पुण्यात येत आहेत. ‘विद्येचे माहेरघर’, राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि समाजसुधारकांच्या विचारांची भूमी असलेल्या पुण्यात राहुल गांधी यांचा विद्यार्थी व तरुणांशी संवाद महत्त्वाचा ठरणार आहे.
विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शैक्षणिक, रोजगारविषयक आणि भविष्यासंदर्भातील ज्वलंत समस्या मांडाव्यात, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले आहे.





