पुणे : कारागृहातील बंद्यांच्या मानसिक परिवर्तनासह त्यांच्या पुनर्वसनाला चालना देण्याच्या उद्देशाने येरवडा खुले जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि वै. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्रासादिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास बंद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार बंद्यांमध्ये सकारात्मक विचार रुजावेत आणि त्यांचे सामाजिक पुनर्स्थापन सुलभ व्हावे यासाठी विविध सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून क्रांतिकारक कीर्तनकार ह.भ.प. निलेश महाराज झरेगावकर यांचे प्रासादिक कीर्तन आयोजित करण्यात आले.
आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीतून निलेश महाराजांनी संत परंपरा, भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज तसेच वाल्मिकी ऋषी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचा दाखला देत मानवी जीवनाचे महत्त्व, चुका सुधारण्याची संधी आणि सद्गुणांचा अंगीकार करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. कीर्तनादरम्यान ज्ञानोबा-तुकारामांच्या गजराने संपूर्ण कारागृह परिसर दुमदुमून गेला आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओव्यांचा उल्लेख करत कीर्तनाच्या संदेशाचे सार मांडले. कारागृहातील बंद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अशा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात सुमारे १५० बंद्यांनी सहभाग नोंदविला. हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य डॉ. सुहास वारके यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, तुरुंग अधिकारी नागनाथ भानवसे यांच्यासह कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि बंदी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.





