प्रतिनिधी – मानस, सोलापूर, जून : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मसवड-पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी (टेम्पो) विहिरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावातील भाविक मसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतत होते. तांदुळवाडी गावाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप गाडी रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीत कोसळली.
या अपघातात वाहनातील आठ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
ग्रामस्थांनी धाव घेत वाचवले जीव
अपघाताची माहिती मिळताच तांदुळवाडी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी बचावकार्य सुरू केले. विहिरीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने सुरुवातीला परिस्थिती गंभीर बनली होती. प्रारंभी मृतांचा आकडा अधिक असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
ग्रामस्थ, पोलिस आणि बचाव पथकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विहिरीत अडकलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यात आला. तपासानंतर वाहनात एकूण १३ जण प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले.
रांझणी गावावर शोककळा
अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. दर्शन आटोपून आनंदाने गावाकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच माळशिरस पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





