प्रतिनिधी – मानस, विजयपूर (कर्नाटक) : कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर येथे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या भीषण गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जमिनीच्या जुन्या वादातून ही सामूहिक हत्या घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गोविंदपूर गावातील निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू होता. या वैमनस्यातूनच अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सर्व मृतांची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
या सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्ह्यासह सीमाभागात मोठी खळबळ उडाली असून भिमातीर परिसरात पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
नागपूरमध्ये वृद्ध दाम्पत्याचा घरात मृतदेह आढळला
नागपूर जिल्ह्यातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दवलामेटी परिसरात एका वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
महाडा वसाहतीतील सदनिका क्रमांक ९१ मधून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहणी केली. त्यावेळी घरातील शयनकक्ष आणि स्वयंपाकघरात वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले.
मृत दाम्पत्य एकटेच राहत होते. त्यांची विवाहित मुलगी नागपूर शहरातील अन्य भागात वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीशी अखेरचा संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नव्हता.
मृतदेहांची अवस्था पाहता दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या, उष्माघात किंवा अन्य कोणत्याही आजारामुळे मृत्यू झाला का, याबाबतचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.





