कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! ‘भरभराट होईल’ म्हणत बंगाली कारागिराला भुलवलं; ३० तोळ्यांचे दागिने लंपास

By: Editor_Manas

On: Friday, May 22, 2026 5:45 AM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, कोल्हापूर : शहरातील भाऊसिंगजी रोड परिसरात एका बंगाली सोनार कारागिराला भुलवून तब्बल ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “तुझं कल्याण होईल, भरभराट होईल” असे सांगत दोन संशयितांनी कारागिराला जाळ्यात ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

कारागिराला भररस्त्यात अडवलं

शुबोदीप समीर पात्रा (वय २०), हा मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात राहतो. त्याचे कुटुंब सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करते. भेंडे गल्लीतील गणपती मंदिराजवळील दुकानात दागिने देण्यासाठी तो सायंकाळी गेला होता.

याचवेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्याला रस्त्यात अडवले. एका व्यक्तीने त्याच्याशी संवाद साधत त्याला बाजूला नेले, तर दुसऱ्याने खिशातील काही वस्तू त्याच्या हातात दिली. त्यानंतर संशयितांनी त्याला विविध सूचना देण्यास सुरुवात केली.

‘संमोहित’ केल्याचा दावा

शुबोदीपने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी त्याला संमोहित केल्यासारखे वाटत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो संशयितांच्या सांगण्यानुसार शांतपणे वागत असल्याचे दिसून आले आहे. काही वेळ संभाषणात गुंतवून संशयितांनी त्याच्याकडील दागिन्यांची बॅग स्वतःकडे घेतली.

दागिने मिळाल्यानंतर त्यांनी शुबोदीपला पुढे चालत जाण्यास सांगितले आणि काही क्षणांतच ते घटनास्थळावरून पसार झाले.

३० तोळे दागिने लंपास

या बॅगेत सुमारे ३० तोळ्यांचे सोन्याचे दागिने असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळाने शुबोदीपला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ वडिलांना माहिती दिली आणि त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात संशयितांनी काही अंतरावर जाऊन रिक्षा पकडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयितांचा शोध सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 22, 2026

May 22, 2026

May 22, 2026

May 21, 2026

May 21, 2026

May 21, 2026