पिंपरी-चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल, ताथवडे, पुणे येथील माजी संचालक डॉ. अमोल आनंदराव गावंडे यांच्याविरुद्ध संस्थेच्या सुमारे ₹४ कोटी ९८ लाख ६६ हजार निधीच्या कथित अपहारासह संस्थेची गोपनीय माहिती (डेटा) चोरणे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झालेल्या तपास अर्जावर प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर ४ जुलै २०२६ रोजी हा गुन्हा नोंदविण्यात आला. संस्थेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अधिकृत तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
संस्थेला प्राप्त झालेल्या अंतर्गत लेखापरीक्षण (इंटरनल ऑडिट) अहवालात डॉ. गावंडे यांनी संचालक म्हणून कार्यरत असताना पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा तसेच जवळपास ₹४.९८ कोटींचा कथित अपहार केल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. याशिवाय संस्थेचा गोपनीय डेटा बेकायदेशीररीत्या हस्तगत करणे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१६(४), ३१८(४), २४८, ३३६ आणि ३४० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ४३, ६६ आणि ७२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, कथित आर्थिक गैरव्यवहाराचे संपूर्ण स्वरूप उघड करणे, निधीच्या व्यवहारांचा मागोवा घेणे तसेच चोरीला गेल्याचा आरोप असलेला डेटा परत मिळविण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासासाठी हजर राहण्याबाबत पोलिसांनी डॉ. अमोल गावंडे यांना अनेक वेळा समन्स बजावले होते. मात्र त्यांनी चौकशीस अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. तसेच ते सध्या भारताबाहेर असून दुबई येथे वास्तव्यास असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. या संदर्भातील अधिकृत तपास सुरू असून, पुढील कारवाई तपासाच्या निष्कर्षानुसार करण्यात येणार आहे.





