प्रतिनिधी – मानस, पुणे : “साहेब, आम्हाला गोळ्या घाला, पण आमची मुलगी शोधून द्या…” अशा शब्दांत कुंजीरवाडी येथील एका अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर हंबरडा फोडला. गेल्या दीड महिन्यांपासून मुलगी बेपत्ता असून अद्याप तिचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवसांत मुलगी सापडली नाही तर मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोचिंग क्लासमधून मुलगी बेपत्ता
कुंजीरवाडी परिसरातील १४ वर्षीय मुलगी एका नामांकित शाळेत नववीत शिक्षण घेत आहे. शाळेला सुट्टी असल्याने ती नेहमीप्रमाणे कोचिंग क्लासला गेली होती. सकाळी तिचा भाऊ तिला रिक्षाने क्लासवर सोडून आला. मात्र क्लास संपल्यानंतर इतर विद्यार्थी बाहेर आले, पण मुलगी दिसून आली नाही. कुटुंबीयांनी परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही.
अपहरणाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात समाधान उर्फ सुशील गंगाधर सूर्यवंशी (वय २४) याचे नाव समोर आले असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अनेक जिल्ह्यांत शोधमोहीम
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यांत शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र आरोपीचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्याने तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पालकांचा संताप
मुलीचे आई-वडील म्हणाले, “दीड महिना झाला तरी आमच्या मुलीचा शोध लागलेला नाही. आम्ही रोज पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत आहोत. आता आमच्याकडे आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.” कुटुंबीयांनी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोरही आंदोलन केले.
माहिती देणाऱ्यास बक्षीस
आरोपीचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा पोलिसांनी केली आहे. नागरिकांनी संबंधित मुलगी किंवा आरोपीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





