मुंबई, मे २०२६ : भारतातील अग्रगण्य उद्योग समूहांपैकी एक असलेल्या बजाज समूह ने आपल्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या भारताच्या प्रवासात बजाज समूहाने दिलेल्या योगदानाचा गौरव या शताब्दी सोहळ्यात करण्यात आला.
१४८ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह बजाज समूह आज भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असून ऑटोमोबाईल, आर्थिक सेवा, ग्राहक उपयोज्य विद्युत उपकरणे आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत आहे. समूहाच्या सेवा भारतातील प्रत्येक तीनपैकी एका घरापर्यंत पोहोचत असून १ लाख ३० हजारांहून अधिक कर्मचारी या समूहात कार्यरत आहेत.
१९२६ मध्ये स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक आणि महात्मा गांधींचे ‘पाचवे मानसपुत्र’ म्हणून ओळखले जाणारे जमनालाल बजाज यांनी मुंबईत समूहाची स्थापना केली. आज समूहाच्या १०० हून अधिक कंपन्या १०० पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात करत आहेत. बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, बजाज इलेक्ट्रिकल्स, बजाज हाउसिंग फायनान्स आणि मुकंद यांसारख्या कंपन्यांनी जागतिक स्तरावर विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख निर्माण केली आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजाज समूहाचे अभिनंदन करत राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. “१०० वर्षांचा प्रवास हा केवळ दीर्घायुष्याचे प्रतीक नसून बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची आणि आर्थिक विकासात योगदान देण्याची क्षमता दर्शवतो,” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले. त्यांनी ‘विकसित भारत २०४७’च्या स्वप्नपूर्तीत बजाज समूहासारख्या संस्थांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही नमूद केले.
मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित शताब्दी सोहळ्यात उद्योगपती, केंद्रीय व राज्य मंत्री, राजकीय नेते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बजाज परिवाराच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागापासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांच्या सादरीकरणासह ‘कथनी करणी एकसी’ या लघुपटाचे प्रदर्शन आणि ‘१०० इयर्स ऑफ बजाज’ लोगोचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बजाज ऑटोचे अध्यक्ष नीरज बजाज यांनी “भारताचा स्वावलंबनाचा प्रवास शंभर वर्षांपूर्वीच सुरू झाला होता,” असे सांगत संस्थापक जमनालाल बजाज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी जागतिकीकरणावर भाष्य करत “बजाज ऑटो आज जगातील पहिल्या तीन दुचाकी कंपन्यांपैकी एक आहे,” असे नमूद केले.
बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी भविष्यातील भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर भर दिला. “AI हे केवळ तंत्रज्ञान नसून आर्थिक समावेशनासाठी एक प्रभावी साधन आहे,” असे ते म्हणाले





