विशाखापट्टणम : भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाचा टप्पा गाठत गुगल कंपनीने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ‘भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रा’ची पायाभरणी केली. अदाणी कॉनेक्स आणि एअरटेल समूहाची माहिती केंद्र सेवा कंपनी यांच्या धोरणात्मक भागीदारीत हा प्रकल्प उभारला जाणार असून, देशात मोठ्या क्षमतेची कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
तर्लुवाडा येथे पार पडलेल्या भूमिपूजन समारंभाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, मंत्री नारा लोकेश तसेच उद्योग क्षेत्रातील करण अदाणी, जीत अदाणी आणि राकेश मित्तल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा प्रकल्प भारतातील गुगल कंपनीची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्याबरोबरच पर्यावरणपूरक विकासावरही भर देणार आहे. ‘विकसित भारत’ या ध्येयपूर्तीत हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सांगण्यात आले.
एअरटेल समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष गोपाल विट्टल यांनी सांगितले की, गुगल आणि अदाणी समूहासोबतची भागीदारी भारताच्या डिजिटल प्रगतीस चालना देईल. विशाखापट्टणम लवकरच जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.
ते पुढे म्हणाले की, अत्याधुनिक माहिती केंद्रे, हरित उर्जेचा वापर, देशभर पसरलेले अतिजलद तंतू-जाळे आणि पुढील पिढीतील केबल अवतरण केंद्रांच्या मदतीने येथे जागतिक दर्जाची कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा उभारली जाणार आहे.
या प्रकल्पामुळे विशाखापट्टणम शहर कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोपक्रमाचे प्रमुख केंद्र बनण्याची शक्यता असून, रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना आणि डिजिटल परिवर्तनाला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



