पिंपरी-चिंचवड | रहाटणी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनात सामाजिक एकता, सनातन संस्कृती आणि हिंदू जागरणाचा संदेश देण्यात आला. या संमेलनात मातृशक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्त्या उज्वलाताई शर्मा-गौड यांनी केले.
या संमेलनाची सुरुवात सायंकाळी ४ वाजता भव्य बाईक रॅलीने झाली. रहाटणी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असा रॅलीचा मार्ग होता. स्मारक येथे शिववंदना करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. थोपटे लॉन्स, रहाटणी येथे या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रेत Talent 4 Nation चे विद्यार्थी, इस्कॉन, वारकरी मंडळ, भजनी मंडळ, बालगोपाल, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख वक्त्या उज्वलाताई शर्मा-गौड तसेच संत आशिर्वचनासाठी ह.भ.प. श्रद्धाताई मोहन पाटखेडकर उपस्थित होत्या. गायत्री परिवाराचे बेनिराम सराटकर हेही मंचावर उपस्थित होते.

उज्वलाताईंनी आपल्या भाषणात मातृशक्तीच्या कर्तव्यावर प्रकाश टाकताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालसंस्कारांचा उल्लेख केला. “आऊ जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना शक्य झाली. समाजात चांगले संस्कार देण्याची जबाबदारी मातृशक्तीची आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच समाजातील विविध विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.
संमेलनादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक बालकलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पंचपरिवर्तन विषय मांडणी भूषण सोंजे यांनी केली. सौ. यशोदाताई अघोर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सौ. पूजाताई जोशी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन धनश्री काळणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल हिंदू समाज रहाटणी समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.






