उरुळी कांचन | प्रतिनिधी – मानस : सोरतापवाडी परिसरात विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवारी (दि.२९) दुपारी सुमारे अडीच ते पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. इस्माईल शेख (वय २०, रा. मगरवस्ती, आळंदी म्हातोबा) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो स्थानिक मित्रांसह सोरतापवाडी – आळंदी म्हातोबा शिवेवरील गुंजाळमळा परिसरातील विहिरीवर पोहण्यासाठी आला होता.
पोहत असताना अचानक दम कोंडल्याने तो पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी हाक दिली. परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले; मात्र तोपर्यंत इस्माईल विहिरीत बुडाला होता.
घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे व पोलिस हवालदार सुपेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये शोककळा पसरली असून, तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





