नवी दिल्ली | प्रतिनिधी
राज्यात गॅस (LPG) टंचाईची परिस्थिती निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी “कदाचित पुढील तीन महिन्यांत एलपीजी गॅस बंद होऊ शकतो,” असे धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकारच्या एका पत्रकात एलपीजी बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पर्याय म्हणून पीएनजी (पाइप गॅस) वापर वाढवणे गरजेचे आहे.
PNG वापरावर सरकारचा भर
भुजबळ यांनी सांगितले की, सध्या पीएनजी गॅस स्वस्त असून निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी त्याचा प्रसार वाढवण्याची आवश्यकता आहे. नगरपालिकांनी नव्या इमारतींना परवानगी देताना पीएनजी कनेक्शनची सक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.
परवानग्या २४ तासांत
पीएनजी पाइपलाइन टाकण्यासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या २४ तासांत देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शहरांमध्ये पीएनजी जोडण्या जलदगतीने वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे.
केरोसीन पर्याय म्हणून
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केरोसीनचा वापर वाढवण्यावरही सरकार विचार करत आहे. ज्या भागात एलपीजी व पीएनजीचा पुरवठा कमी आहे, तेथे केरोसीन पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली असून, पेट्रोल पंपांवरूनही केरोसीन उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे.
या घडामोडींमुळे ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नागरिकांना पर्यायी गॅस वापराकडे वळण्याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे.





