अहमदपूर | प्रतिनिधी :- मानस : राज्यात इंधन टंचाईची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी होत आहे. काही ठिकाणी ‘नो स्टॉक’चे फलक लागल्याने परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे. याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे पेट्रोल पंपावर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून चार जण जखमी झाले आहेत.
अहमदपूरमधील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ग्राहकांकडून घुसखोरी तसेच कॅन व प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल देण्याची मागणी केली जात होती. मात्र, नियमांनुसार बाटलीत पेट्रोल देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यानंतर वादाला सुरुवात झाली.
हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि ग्राहक व पंप कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींमध्ये जोरदार मारामारी झाली. काठ्या व इतर वस्तूंचा वापर करत हाणामारी करण्यात आली. या घटनेत एकाचे डोके फुटले असून इतर तीन जण जखमी झाले आहेत. एका व्यक्तीने लोखंडी बाकडाही उचलल्याची माहिती मिळाली, मात्र इतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, इंधन टंचाईच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अधिक प्रमाणात पेट्रोल भरण्याचा कल दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पंप कर्मचाऱ्यांशी वाद वाढत असल्याचे चित्र आहे.
इतर ठिकाणीही गर्दीचा उच्चांक
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथेही पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली. पेट्रोल-डिझेल मिळणार नाही या भीतीने नागरिक कॅन घेऊन सकाळपासूनच पंपावर दाखल झाले. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा एक किलोमीटरपर्यंत वाढल्याने कर्मचार्यांची मोठी तारांबळ उडाली.
दरम्यान, केंद्र व राज्य सरकारने इंधन टंचाई नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अफवांमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.





