राष्ट्रीय, मार्च २४, २०२६: कोक स्टुडिओ भारत या भारताच्या वैविध्यपूर्ण संगीत वारशाला साजरे करणाऱ्या मंचाने ‘ऐ अजनबी’ या पहिल्या गाण्यासह आपल्या सीझन ४ ची सुरुवात केली आहे. हे गाणे एका भावनेवर आधारित आहे जी कधीही जुनी होत नाही, ती म्हणजे ‘ओढ’. आदित्य रिखारी यांचा मधुरमय आवाज, लोकसंगीताचे निष्णात कलाकार कुतले खान यांची प्रभावी शैली आणि रॅवॅटर यांची संगीत निर्मिती यांतून साकारलेले हे गाणे म्हणजे दोन युगांमधील संवाद आहे. हा संवाद पत्रांमध्ये लिहिलेल्या प्रेमाचा, तसेच पाठवल्या न गेलेल्या संदेशांमध्ये दडलेल्या प्रेमाचा आहे.
‘ऐ अजनबी’ हे गाणे साध्या पण वैश्विक सत्याचा शोध घेते, ते म्हणजे प्रेमाची भाषा बदलली असली, तरी त्यामागील व्याकुळता तीच आहे. चोरून पाहिलेले कटाक्ष आणि हाताने लिहिलेल्या कवितांच्या शांततेपासून रात्री उशिरापर्यंत केलेले मेसेजेस आणि अपूर्ण राहिलेल्या कबुलीपर्यंत हे गाणे कोणत्याही एका काळाची बाजू न घेता प्रेमामध्ये असलेल्या ओढीचा प्रवास मांडते. हे गाणे ना भूतकाळाचे अति-उदात्तीकरण करते, ना वर्तमानाकडे धाव घेते, तर या दोन्ही काळांना एकमेकांच्या सोबतीने जगू देते.
संगीताच्या बाबतीतही हे गाणे अशाच एका भावनिकतेला सादर करते. लोकसंगीतातील गोडवा आणि समकालीन पॉप यांचा येथे नैसर्गिक संगम झाला आहे, ज्यामुळे परंपरेचा वारसा जपणारे आणि वर्तमानाचा श्वास घेणारे अनोखे गाणे आकारास आले आहे. आदित्य रिखारी या गाण्याला वास्तवाशी आणि सर्वसामान्यांना पटेल अशा भावनांशी जोडतात, तर कुतले खान या गाण्यामध्ये प्रादेशिक सखोलपणा आणि आत्मीयता आणतात, जी ‘ओढी’इतकीच जुनी वाटते. रॅवॅटर या दोन्ही जगांना एकत्र विणण्याचे काम करतात, ज्यामुळे हे गाणे नवे वाटते पण त्याचा मूळ गाभा तसाच राहतो. या सर्वांचा परिणाम म्हणजे हे गाणे जुन्या काळातील भावपूर्ण मेलोडीजवर प्रेम करणाऱ्यांना आणि पहिल्यांदाच प्रेमाचा अनुभव घेणाऱ्या आजच्या तरुणांना आपलेसे वाटते.
कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाचे आयएमएक्स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्स्पीरिअन्स) प्रमुख शंतनू गंगाणे म्हणाले, ”आज भारतीय संगीत केवळ एका मर्यादित चौकटीत राहिलेले नाही. श्रोते आता लोकसंगीत, इंडी, इलेक्ट्रॉनिक अशा अनेक संगीत प्रकारांचा आनंद घेतात. ‘ऐ अजनबी’ या गाण्याच्या माध्यमातून कोक स्टुडिओ भारतने विविध पिढ्या, संस्कृती आणि सोनिक्स यांना एकत्र आणले आहे.
आम्हाला अत्यंत प्रतिभावान आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले आदित्य रिखारी यांच्यासोबत या सीझनची सुरुवात करताना खूप आनंद होत आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आणि लोकसंगीताचे दिग्गज कुतले खान यांची पारंपरिक मुळे यांचा मिलाफ म्हणजे कोक स्टुडिओ भारतचा खरा आत्मा आहे. डीजे रॅवॅटर यांनी या दोन भिन्न जगांना एकाच मंचावर आणण्याचे अप्रतिम काम केले आहे, ज्यातून कोक स्टुडिओ भारत सीझन ४ ची दमदार सुरुवात झाली आहे.”
आदित्य रिखारी म्हणाले, ”’ऐ अजनबी’ गाणे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलेल्या भावनेला स्पर्श करते. कोणाची तरी ओढ लागणे, कोणाची तरी उणीव भासणे आणि प्रत्येक वेळी त्या भावनेला शब्दांत मांडता न येणे हेच या गाण्यात आहे. माझ्यासाठी या गाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हे गाणे त्या भावनेला अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही, तर ती भावना मूळ अस्तित्वात राहू देते. कोक स्टुडिओ भारतने आम्हाला ही भावना अत्यंत प्रामाणिकपणे मांडण्याची संधी दिली आणि मला विश्वास आहे की, हाच खरेपणा श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करेल.”
कुतले खान म्हणाले, ”लोकसंगीताने नेहमी ओढीचा इतिहास जपला आहे. खरेतर लोकसंगीत त्यातून निर्माण झाले आहे. ‘ऐ अजनबी’च्या माध्यमातून आम्ही काहीतरी जुने पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही, तर जुन्या भावनेला नव्या आवाजात व्यक्त केले आहे.. माझ्या मते, संगीताच्या माध्यमातून हेच काम करायला पाहिजे आणि कोक स्टुडिओ भारतने मंच उपलब्ध करून दिला आहे, जेथे हा संवाद शक्य झाला आहे.”
रॅव्हेटर म्हणाले, ”हे गाणे सुरुवातीपासूनच अतिशय सहज आणि स्वाभाविक वाटले. माझ्यासाठी या गाण्याच्या निर्मितीचा दृष्टिकोन अगदी साधा होता, जेथे गाण्यामध्ये मूळ प्राधान्य देण्यात आलेल्या भावनेला कायम ठेवण्यात आले आहे. आदित्य आणि कुतले खान यांनी या गाण्यात इतकी भावना ओतली होती की, मी फक्त त्या ऊर्जेचे अनुसरण केले. हे गाणे मुळात अस्तित्वात असलेल्या भावना जाणून घेण्याबाबत आणि त्यासंदर्भात संगीत रचण्याबाबत होते.”
गाणे ‘ऐ अजनबी’सह सुरुवात करत सीझन ४ श्रोत्यांना आठवण करून देतो की, संगीताचे स्वरूप काळानुसार बदलले तरी मानवी भावना कायम आहेत. हा पुढील प्रवास अशाच काही वैश्विक सत्यांचा शोध घेणारा असेल, जेथे आजच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे आवाज आणि कालच्या परंपरेला आकार देणारा वारसा यांचे सुरेख संयोजन पाहायला मिळेल.





