पुणे: रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा निर्धार आठवले गटाचे प्रमुख व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यात रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी आरपीआय चे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, जनरल सेक्रेटरी गौतम सोनवणे, सचिव बाळासाहेब जानराव, उपमहापौर परशुराम वाडेकर, चंद्रकांता सोनाकांबळे, सूर्यकांत वाघमारे, महिपाल वाघमारे, नीलेश अल्हाट, हिमाली कांबळे, निशा मानवतकर, बसवराज गायकवाड, विशाल शेवाळे, जयदेव रंधवे, नीलेश रोकडे, सचिन मानवतकर, विरेन साठे आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्मांचा, समाजातील उपेक्षित वर्गाचा, तरुणांचा महिलांचा पक्ष असून त्याला सर्वसमावेशक स्वरूप देण्याचे कार्य हाती घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पद्दूचेरी या राज्यात आपला पक्ष विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करणार आहे, असेही ते म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाच्या निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केला जाणार असून त्यात पक्ष विस्ताराच्या दृष्टीने धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुण्यात देखील बैठक घेऊन पक्ष विस्ताराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले. समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता ही त्यांनी व्यक्त केली.
मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडून जागा मिळाल्या नसल्या तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळाचे अध्यक्षपद आणि पुरेशा प्रमाणात महामंडळांची सदस्य पदे देण्यात येतील अशी ग्वाही दिली असल्याचेही आठवले यांनी नमूद केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताची शक्यता आपल्याला वाटत नाही. मात्र, या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, संबंधित विमान कंपनीवर कठोर कारवाई व्हावी अशीच आपली देखील मागणी असल्याचे आठवले यांनी सांगितले.
भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना, राज्यातील सर्वच भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे आठवले म्हणाले. कॅप्टन खरात याच्या गुन्ह्यांची व्याप्ती बघता त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.





