पुणे : अवीट गोडीच्या चालींनी सजलेल्या बंदिशी, गायकांचे अप्रतिम सादरीकरण, सरोदच्या तारांवर उमटणारे मधुर सूर आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा सुरेल संगमाने पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव रंगून गेला.
तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ संस्थेतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित विसाव्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात निषाद व्यास (गायन), अनुपम जोशी (सरोद) आणि जयंत केजकर (गायन) यांनी आपल्या कलेचा अप्रतिम आविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सकाळच्या सत्राची सुरुवात निषाद व्यास यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग गुजरी तोडीमध्ये सादर केलेल्या ‘सरस्वती चे मागत हो’ या बंदिशीने रसिकांना सुरेल आनंदाची अनुभूती दिली. त्यानंतर ‘साधू रचना राम बनाई रे’ या सादरीकरणातून त्यांनी बनारस घराण्याच्या गायकीचा ठसा उमटवला. त्यांच्या सादरीकरणाला कौशिक केळकर (तबला) आणि माधव लिमये (संवादिनी) यांची समर्थ साथ लाभली.
यावेळी बोलताना निषाद व्यास यांनी, “जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे. येथे गायन करणे म्हणजे पंडित अभिषेकी यांच्या चरणी संगीत सेवा अर्पण करण्यासारखे आहे,” असे सांगितले.
यानंतर अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाने मैफिलीत वेगळाच रंग भरला. त्यांनी राग बसंतने वादनाची सुरुवात केली. सरोद हे वाद्य मुख्यतः राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचलित असले तरी मराठी संगीत परंपरेशी त्याचा संगम घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘खेळ मांडीयेला वाळवंटी दारी, नाचती वैष्णव ठायी रे’ हा अभंग सरोदवर सादर करत त्यांनी वातावरण भक्तिमय केले. त्यांच्या सादरीकरणाला महेशराज साळुंखे आणि संजय प्रधान (तबला) यांची साथ लाभली. यावेळी आयोजक उज्वल केसकर यांनी कलाकारांचा सत्कार केला.
महोत्सवातील ‘पंडित जितेंद्र अभिषेकी प्रथितयश कलाकार’ पुरस्कार प्राप्त जयंत केजकर यांनीही आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी राग जौनपुरीने मैफिलीची सुरुवात करत विविध रागांच्या सादरीकरणातून अभिजात संगीताची मेजवानी दिली. त्यांच्या सादरीकरणाला अभिजीत जायदे (तबला) आणि लीलाधर चक्रदेव (संवादिनी) यांनी समर्थ साथ दिली.
संपूर्ण सत्रभर रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद देत महोत्सवाची रंगत अधिक खुलवली.
सुर-संगीताने रंगले पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे चौथे सत्र
By: Editor_Manas
On: Tuesday, March 24, 2026 1:30 PM
aapka prahar, aapka prahar times, baramati plane crash, deputy cm ajit pawar, prahaar, prahar, prahar janshakti party agitation, prahar protest pune, prahar sanghatana, prahar sanghatana news, prahar times, prahar times mumbra, prakar organization, protest in pune, pune, pune handicap protest, pune it park, pune news update, pune prahar protest, pune protest, pune traffic protest, sharad pawar, unique protest pune, zilla parishad pune





