जुन्नर : ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने ‘डिजिटल वॉक’ क्यू-आर कोड प्रणालीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. या उपक्रमामुळे शिवनेरीला भेट देणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांना किल्ल्याचा इतिहास आता ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात अनुभवता येणार असून, ही सुविधा मार्गदर्शकाप्रमाणे उपयुक्त ठरणार आहे.
या कार्यक्रमाला भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे सहाय्यक प्रमुख प्रा. पुष्कर सोहोनी, केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्त्वविद ए. व्ही. नागणोर, ‘गुंज इंडिया’चे नितीन मेणवलीकर व सचिन जोशी, पुरातत्व विभागाचे सर्वेक्षक सहाय्यक बाबासाहेब जंगले, वनविभागाचे कर्मचारी, कुसूरचे सरपंच दत्तात्रेय ताजणे, श्री शिवाई देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेचे समन्वयक उपस्थित होते.
प्रा. पुष्कर सोहोनी यांच्या हस्ते या डिजिटल सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, “पुरातत्व विभाग नेहमीच अधिकृत आणि अचूक इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. क्यू-आर कोड आणि डिजिटल वॉकच्या माध्यमातून शिवनेरीचा इतिहास आता ऐकता आणि व्हिडिओद्वारे पाहता येणार आहे.”
ही संकल्पना केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनातून साकारण्यात आली आहे. कार्यक्रमाचे स्वागत बाबासाहेब जंगले यांनी केले, तर सूत्रसंचालन ओंकार गरुड यांनी केले. संतोष केदारी यांनी आभार मानले.
याबाबत ए. व्ही. नागणोर यांनी सांगितले की, सध्या भारतीय पुरातत्व विभागाच्या ८ वारसास्थळांवर आणि १३ तिकीट असलेल्या स्थळांवर डिजिटल हेरिटेज वॉक सुरू करण्यात आला आहे. पुढील काळात ऐतिहासिक घटनांशी संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओही या प्रणालीत समाविष्ट केले जाणार आहेत.
जीपीएस तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना संबंधित ठिकाणाचा इतिहास त्यांच्या भाषेत ऐकता येणार असून, मराठी, हिंदी, इंग्रजीसह जर्मन आणि फ्रेंच भाषांमध्येही माहिती उपलब्ध करून देण्याची योजना आहे. आगामी काळात देशभरातील सुमारे १५० ठिकाणी ‘ऑडिओ गाईड’ सुविधा सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.





