युवोन्मेश मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगले पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र 

By: Editor_Manas

On: Saturday, March 21, 2026 1:05 PM

Google News
Follow Us

पुणे – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन करणारी पखवाज वादनाची जुगलबंदी आणि रसिकांच्या टाळ्या-वाहव्यांच्या गजरात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवातील ‘युवोन्मेश’ ही खास युवा कलाकारांची मैफिल रंगली.

तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्राची सुरुवात गायिका डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी राग गुजरी तोडीमध्ये विलंबित ख्याल आणि द्रुत बंदिश सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाला गीत इनामदार, उमेश पुरोहित (तबला) आणि सुकन्या जोशी (तानपुरा) यांनी समर्पक साथ दिली.

यावेळी बोलताना डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे म्हणाल्या, “या प्रतिष्ठित महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे हे माझे भाग्य असून, हे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे आशीर्वादच आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश रामदासी यांनी केले, तर रश्मी अभिषेकी यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, “अभिजात संगीताचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मोठे योगदान दिले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ‘युवोन्मेश’ हा विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे.”

या प्रसंगी देवश्री कचरे आणि मंगल गवळी यांच्या हस्ते डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांचा सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या सत्रात पखवाज वादक पार्थ भूमकर आणि प्रथमेश तारळकर यांनी दमदार पखवाज वादन सादर केले. त्यांच्या प्रत्येक थापेसह मैफिल रंगत गेली आणि सभागृहात भक्तीमय वातावरणाची अनुभूती निर्माण झाली. अथर्व कुलकर्णी (संवादिनी) यांनी त्यांना साथ दिली.

महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात आसामच्या गायिका श्रुती बुजरबारूआ यांनी अप्रतिम गायन सादर केले. त्यांनी राग शुद्ध सारंगमध्ये ‘धरणी धरोहर’ ही रूपक मध्य तालातील बंदिश सादर करत रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला पार्थ ताराबादकर (तबला) आणि सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) यांनी समर्थ साथ दिली.

यावेळी भावना व्यक्त करत श्रुती बुजरबारूआ म्हणाल्या, “या महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. आसामहून महाराष्ट्रात आल्यानंतर मी पंडित विजय कोपरकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. त्यामुळे पुण्यात सादरीकरण करणे म्हणजे माझ्यासाठी माहेरच्या ठिकाणी संगीत सेवा करण्यासारखे आहे.”

युवा कलाकारांच्या उत्स्फूर्त आणि दर्जेदार सादरीकरणामुळे ‘युवोन्मेश’ मैफिलीने महोत्सवात विशेष रंग भरला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026