क्रेडिट मॉनिटरिंग मुख्य प्रवाहात; १८३ दशलक्ष भारतीय आता स्वतःचा सिबिल स्कोअर तपासत आहेत

By: Editor_Manas

On: Friday, March 20, 2026 3:46 PM

Google News
Follow Us

मुंबई, भारत, २० मार्च २०२६: भारतात क्रेडिट वापराबाबत अधिक जागरूक आणि सक्रिय टप्प्याची सुरुवात होत असून क्रेडिट मॉनिटरिंग आता दैनंदिन आर्थिक सवयींचा भाग बनत आहे. पूर्वी केवळ कर्ज घेताना एकदाच केले जाणारे हे काम आता ग्राहकांकडून नियमितपणे केले जाणारे आणि आर्थिक शिस्तीचा महत्त्वाचा भाग ठरत आहे, असे ट्रान्‍सयुनियन सिबिलच्‍या ‘सिबिल फॉर एव्‍हरी इंडियन – अनकव्‍हरिंग हाऊ इंडिया ओन्‍ड इट्स क्रेडिट जर्नी इन २०२५’ या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, भारतातील क्रेडिटविषयक वर्तनात मोठा बदल दिसून येत आहे. केवळ माहिती ठेवण्यापासून पुढे जाऊन ग्राहक आता सक्रियपणे आपल्या क्रेडिटवर नियंत्रण ठेवू लागले आहेत. क्रेडिट मॉनिटरिंग हे आता केवळ कर्ज घेण्यासाठी उपयुक्त साधन राहिले नसून आत्मजागरूकता, आर्थिक शिस्त आणि सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम बनले आहे.

  • डिसेंबर २०२५ पर्यंत, पहिल्यांदाच आपल्या सिबिल स्कोअरची तपासणी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वार्षिक २७ टक्‍के वाढ झाली आहे.
  • स्वतःच्या स्कोअरवर लक्ष ठेवणाऱ्या ग्राहकांचा सरासरी सिबिल स्कोअर वाढून ७२८ पर्यंत पोहोचला, त्यापैकी ४५ टक्‍के ग्राहकांनी देखरेख सुरू केल्यापासून सहा महिन्यांच्या आत आपल्या स्कोअरमध्ये सुधारणा केली आहे.
  • मिलेनियल आणि जनरेशन झेड ग्राहक, महिला आणि नॉन-मेट्रो भागातील नागरिक क्रेडिट क्षेत्रातील या बदलाचे नेतृत्व करत आहेत. त्यांचे योग्य नियोजन आणि गोल्ड लोन (सुवर्ण कर्ज) व दुचाकी कर्जासारख्या सुरक्षित कर्ज पर्यायांना मिळणारी पसंती यामुळे हा बदल दिसून येत आहे.

डिसेंबर २०२५ पर्यंत, विविध वयोगटांतील स्वतःचा सिबिल स्कोअर तपासणाऱ्या भारतीयांची संख्या १८३ दशलक्षांवर पोहोचली आहे. पहिल्यांदाच आपल्या क्रेडिटची तपासणी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वार्षिक २७ टक्‍के वाढ झाल्यामुळे हा टप्पा गाठता आला आहे. हा वाढता वेग निदर्शनास आणतो की, क्रेडिटबद्दलची जागरूकता आता मुलभूत आर्थिक सवय म्हणून मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जात आहे.

ग्राहक नियमितपणे आपला सिबिल स्कोअर तपासत असल्याचा सकारात्मक परिणामही दिसून येतो. जवळपास ४५ टक्‍के ग्राहकांनी केवळ सहा महिन्यांत आपला क्रेडिट स्कोअर सुधारला आहे. स्कोअर तपासणाऱ्या ग्राहकांचा सरासरी सिबिल स्कोअर ७२८[1] इतका असून, सक्रिय मॉनिटरिंग आणि चांगल्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये थेट संबंध असल्याचे यातून दिसते. क्रेडिट मॉनिटरिंग ही अधूनमधून केली जाणारी क्रिया न राहता एक सवय बनल्याने ग्राहकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. विशेषतः मिलेनियल आणि जनरेशन झेड[2] वयोगटातील तरुण कर्जदार, महिला आणि नॉन-मेट्रो भागातील ग्राहक या बदलाचे नेतृत्व करत आहेत.

ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. भावेश जैन म्हणाले, “पूर्वी अनेक ग्राहक आपला क्रेडिट प्रोफाइल फक्त वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसारख्या उत्पादनांची गरज भासली तेव्हाच पाहत असत. पण आज क्रेडिट मॉनिटरिंग हे केवळ एका व्यवहारापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते सतत पाळली जाणारी आर्थिक सवय बनली आहे. ग्राहकांचा दृष्टिकोन व्यवहारकेंद्री न राहता मजबूत आणि टिकाऊ क्रेडिट प्रोफाइल तयार करण्याकडे वळला आहे. एकंदरीत, भारत केवळ कर्ज घेण्यापासून पुढे जाऊन त्यावर सक्रिय नियंत्रण ठेवण्याकडे वाटचाल करत आहे. मॉनिटरिंग हीच या बदलाची मुख्य कडी ठरत आहे, सिबिल स्कोअर हा केवळ स्थिर आकडा न राहता आर्थिक मजबूतीचा संकेतक बनला आहे, ज्यावर ग्राहक सतत लक्ष ठेवतात आणि सुधारणा करतात.

नॉन-मेट्रो भाग: भारताच्या वाढीचे नवे केंद्र

भारतामध्ये क्रेडिटविषयक जागरूकतेची चळवळ आता अधिकाधिक नॉन-मेट्रो भागांतून आकार घेत आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत सुमारे ७५ टक्‍के क्रेडिट मॉनिटरिंग करणारे ग्राहक नॉन-मेट्रो क्षेत्रांतील होते, ज्यामध्ये वर्षागणिक २८ टक्‍के वाढ नोंदवली गेली आहे. मोठ्या शहरांपलीकडे क्रेडिट जागरूकता झपाट्याने वाढत असल्याचे हे चित्र दर्शवते. पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्या ग्राहकांमध्येही हा कल स्पष्ट दिसतो. नव्याने क्रेडिट प्रणालीत येणाऱ्या ७८ टक्‍के ग्राहकांचा सहभाग नॉन-मेट्रो भागातून आहे. याशिवाय, ७३ टक्‍के प्राइम स्कोअर (७३१+) असलेले ग्राहकही याच भागात राहतात, ज्यामुळे या प्रदेशातील क्रेडिट गुणवत्ताही मजबूत असल्याचे दिसते.

उच्च सहभाग आणि चांगले क्रेडिट प्रोफाइल यांचा संगम नॉन-मेट्रो भागांना भारताच्या बदलत्या क्रेडिट व्यवस्थेतील महत्त्वाचा चालक बनवत आहे. प्रवेशातील अडथळे कमी होत असल्याने जागरूकता ही आर्थिक संधीसाठी अधिक समतोल शक्ती ठरत आहे. नॉन-मेट्रो भाग केवळ सहभाग घेत नाहीत, तर मॉनिटरिंग करणाऱ्या ग्राहकांची संख्या आणि क्रेडिट प्रोफाईलच्या गुणवत्तेतही आघाडीवर आहेत.

जनरेशन झेड: भारताची पहिली ‘क्रेडिट-नेटिव्ह’ पिढी

मागील पिढ्यांच्या तुलनेत, ज्या पिढ्यांना आयुष्याच्या पुढील टप्प्यावर क्रेडिट स्कोअरची ओळख झाली, त्यापेक्षा आजचे तरुण, विशेषतः मिलेनियल आणि जनरेशन झेड आपल्या आर्थिक प्रवासाच्या सुरुवातीलाच आर्थिक साधनांचा वापर करत आहेत. हे तरुण कर्जदार मिळून एकूण मॉनिटरिंग करणाऱ्या ग्राहकांपैकी ७७ टक्‍के आहेत, ज्यातून डेटा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि स्वयंसेवा साधनांबाबत त्यांची सहजता दिसून येते.

जनरेशन झेड ही भारतातील पहिली खरी ‘क्रेडिट-नेटिव्ह’ पिढी म्हणून उदयास येत आहे. या पिढीत आर्थिक प्रोफाइलबाबत नैसर्गिक समज आणि सक्रिय सहभाग दिसतो. त्यांच्या क्रेडिट मॉनिटरिंगमध्ये १.४१ पट वाढ झाली असून ती इतर गटांच्या तुलनेत अधिक आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण मॉनिटरिंग बेसपैकी २९ टक्‍के हिस्सा जनरेशन झेड ग्राहकांचा होता.

ही पिढी केवळ क्रेडिटचा वापर करून पाहत नाही, तर सुरुवातीपासूनच जबाबदारीने त्याचे व्यवस्थापन करण्यावर भर देत आहे. त्यांच्या सक्रिय मॉनिटरिंग सवयींचा परिणाम त्यांच्या कर्ज घेण्याच्या पद्धतीतही दिसतो. मॉनिटरिंगनंतर जनरेशन झेड ग्राहक अधिक धोरणात्मक पद्धतीने कर्ज उत्पादने निवडताना दिसतात. स्व-मॉनिटरिंग करणाऱ्या जनरेशन झेड ग्राहकांमध्ये गोल्ड लोनमध्ये वर्षागणिक ६१% वाढ झाली, तर अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागात त्यांच्या दुचाकी कर्जांमध्ये २३ टक्‍के वाढ नोंदवली गेली आहे.

ही पिढी क्रेडिट वापराबाबत नवे मापदंड निश्चित करत आहे. सुरुवातीच्या काळातील जागरूकता आणि योग्य उत्पादनांची निवड यामुळे अधिक जबाबदार आणि सक्षम आर्थिक भविष्य घडवता येते, हे या पिढीने सिद्ध करून दाखवले आहे.

महिला: भारतातील नव्या क्रेडिट नेतृत्वाचा चेहरा

भारताच्या आर्थिक क्षेत्रात महिला अतिशय महत्त्वाचे बदल घडवून आणत आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत, क्रेडिट मॉनिटरिंगमधील महिलांचा सहभाग अत्यंत वेगाने वाढला आहे. पुरुष ग्राहकांमधील वार्षिक २५ टक्‍के वाढीच्या तुलनेत स्वतःचा क्रेडिट स्कोअर तपासणाऱ्या महिलांच्या संख्येत वार्षिक ३८ टक्‍के इतकी लक्षणीय वाढ झाली आहे.

क्रेडिट मॉनिटरिंग करणाऱ्या एकूण ग्राहकांमध्ये महिलांचा वाटा आता २१ टक्‍के झाला आहे, जो यापूर्वी १९ टक्‍के होता. विशेषतः नॉन-मेट्रो भागात ही वाढ अधिक दिसून येत आहे, जिथे नव्याने स्वतःचा क्रेडिट स्कोअर तपासणाऱ्या महिलांपैकी ७१ टक्‍के या भागातून येतात. जवळपास ६३ टक्‍के महिला ग्राहकांचा प्राइम स्कोअर (७३१+) आहे, त्यातून त्यांच्या मजबूत क्रेडिट स्थितीची आणि जबाबदार आर्थिक वर्तनाची जाणीव होते. या सर्व आकडेवारीवरून महिलांचा भारताच्या बदलत्या क्रेडिट व्यवस्थेत प्रभावी आणि वाढता सहभाग स्पष्ट दिसून येतो.

महिला केवळ कर्जाचा वापर करत नाहीत, तर मॉनिटरिंगनंतर त्यांची कर्ज घेण्याची पद्धत त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत असल्याचे दिसते. विविध कर्ज पर्यायांची सखोल समजही त्यातून दिसून येते. स्वतःचा स्कोअर तपासणाऱ्या महिलांमध्ये गोल्ड लोनमध्ये ३८ टक्‍के वाढ झाली असून, सुरक्षित आणि स्थिर कर्ज पर्यायांना त्यांची स्पष्ट पसंती असल्याचे यातून दिसते.

हे सकारात्मक कल केवळ महिलांच्या वैयक्तिक आर्थिक प्रगतीसाठीच नव्हे, तर एकूणच भारतासाठी अधिक समावेशक, मजबूत आणि परिपक्व क्रेडिट भविष्य घडवण्यास हातभार लावत आहेत.

क्रेडिट मॉनिटरिंग: एक चळवळ

क्रेडिट मॉनिटरिंगमुळे जागरूकता निर्माण होते, त्यानंतर कृती घडते आणि त्यातून प्रत्यक्ष फायदे मिळतात, अशी एक साधी पण प्रभावी प्रक्रिया यात दिसते. मॉनिटरिंग केवळ वर्तन दर्शवत नाही, तर ते बदलण्यासही मदत करते.

स्वतःचा स्कोअर तपासणाऱ्या भारतीयांमध्ये दिसणारे ट्रेंड गोल्ड लोनच्या वाढत्या लोकप्रियतेची पुष्टी करतात. आपत्कालीन पर्याय म्हणून पाहिले जाणारे गोल्ड लोन आता मुख्य प्रवाहातील कर्ज साधन बनत आहे. मॉनिटरिंग सुरू केल्याच्या तीन महिन्यांच्या आत गोल्‍ड लोन घेण्याच्या प्रमाणात २५ टक्‍के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, जनरेशन झेड ग्राहकांना कर्ज वितरणात दुपटीने वाढ झाली आहे. अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागात गोल्ड लोनमध्ये २६ टक्‍के वाढ नोंदवली गेली.

त्याचप्रमाणे, मॉनिटरिंग सुरू केल्याच्या तीन महिन्यांच्या आत दुचाकी कर्ज घेण्याच्या प्रमाणात वार्षिक ६ टक्‍के वाढ दिसून आली आहे. यामध्ये लहान शहरांतील जनरेशन झेड कर्जदारांच्या संख्येत २३ टक्‍के इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. स्वतःच्या क्रेडिट स्कोअरवर लक्ष ठेवणाऱ्या ग्राहकांपैकी १७ टक्‍के ग्राहकांनी मॉनिटरिंग सुरू केल्याच्या तीन महिन्यांच्या आत कन्झप्शन लोन म्हणजेच उपभोग कर्ज घेतले आहे.

या बदलाच्या केंद्रस्थानी भारतीय ग्राहक क्रेडिटकडे कसे पाहतात आणि वापरतात यामधील एक मोठा बदल आहे. क्रेडिट मॉनिटरिंगमुळे त्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीची अधिक स्पष्ट कल्पना मिळत आहे आणि ते अधिक जागरूकतेने व ठोस उद्देशाने औपचारिक कर्ज व्यवस्थेशी जोडले जात आहेत. ही सवय अधिक व्यापक होत असताना, लाखो छोटे पण माहितीपूर्ण निर्णय आणि सातत्यपूर्ण कृती मिळून भारतात अधिक सक्षम, समावेशक आणि परिपक्व क्रेडिट व्यवस्था घडवत आहेत.

श्री. जैन म्हणाले, “क्रेडिट मॉनिटरिंग आता व्यापक पातळीवर रूजलेली सवय बनली आहे. लाखो भारतीय नियमितपणे आपला सिबिल स्कोअर आणि रिपोर्ट तपासत आहेत. ही सवय आता केवळ समृद्ध शहरी भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही. नॉन-मेट्रो भारत आर्थिक समावेशनाची नवी व्याख्या करत असून, क्रेडिटचा स्वीकार आणि गुणवत्ता या दोन्ही बाबतीत आघाडीवर आहे.

“जनरेशन झेड आणि मिलेनियल ही भारतातील पहिली क्रेडिट-नेटिव्ह पिढी सुरुवातीपासून आणि पद्धतशीरपणे क्रेडिट डेटाचा वापर करत आहे. तसेच महिला कर्ज घेणे आणि क्रेडिट व्यवस्थापनात अधिक सक्रिय आणि जागरूक भूमिका घेत आहेत. हे सर्व घटक मिळून नव्या क्रेडिट संस्कृतीला चालना देत असून, अधिक शिस्तबद्ध आणि डेटा-आधारित दृष्टिकोन निर्माण करत आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

“ट्रान्सयुनियन सिबिलमध्ये आम्हाला अभिमान आहे की, प्रत्येक पात्र ग्राहक आणि व्यवसायाला जबाबदारीने कर्ज मिळावे यासाठी आम्ही महत्त्वाची भूमिका बजावत आहोत. गेल्या काही वर्षांत भारतात क्रेडिट वापराबाबत शांतपणे पण ठोस असा बदल झाला आहे, जो आता सक्रीय आणि सुजाण कर्ज व्यवस्थापनाच्या दिशेने वळला आहे. पुढेही आम्ही शाश्वत क्रेडिट वाढीसाठी काम करत राहू आणि विविध स्तरांमध्ये व भौगोलिक भागांमध्ये आर्थिक समावेशन अधिक बळकट करण्यास हातभार लावू,” असे श्री. जैन यांनी शेवटी नमूद केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026