Uruli Kanchan : फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न; पती-पत्नीच्या धाडसामुळे चोर अटकेत

By: Editor_Pratik

On: Monday, March 16, 2026 11:07 AM

Google News
Follow Us

Uruli Kanchan : सकाळच्या फेरफटक्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ४.१२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला पती-पत्नीच्या धाडसामुळे पकडण्यात यश आले. ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एम. जी. रोड परिसरात सोमवारी (१६ मार्च) सकाळी घडली. पकडलेल्या अल्पवयीन आरोपीला आणि त्याची मोटरसायकल उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत लक्ष्मण काळे (वय ५१) आणि त्यांच्या पत्नी जयश्री भरत काळे (वय ४३) हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहाच्या सुमारास एम. जी. रोड परिसरात फेरफटका मारत होते. त्यावेळी लोणारी नगर परिसरात समोरून मोटरसायकलवर आलेल्या कामशेत (ता. मावळ) येथील अल्पवयीन चोरट्याने जयश्री काळे यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाचे, अंदाजे ४ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला.

घटना घडताच भरत आणि जयश्री काळे यांनी प्रसंगावधान राखत चोरट्याचा पाठलाग सुरू केला. भरत काळे यांनी मोटरसायकल पकडण्याचा प्रयत्न केल्याने दुचाकी घसरून पडली. त्यानंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतेही हत्यार असण्याची शक्यता असूनही भरत काळे यांनी धाडस दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.

दरम्यान, परिसरातील नागरिकही घटनास्थळी जमा झाले. पोलीस विजय कांचन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडून त्याच्याकडील दागिने व मोटरसायकल उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती भरत काळे यांनी दिली.

उरुळी कांचन परिसरात यापूर्वीही दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी यात्रेदरम्यान एका मुलाच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरण्याचा प्रयत्न करताना चोराला नागरिकांनी पकडल्याची घटना घडली होती. तसेच परिसरात अतिवेगाने फिरणाऱ्या दुचाकींविषयी नागरिकांनी पोलिसांना यापूर्वीच माहिती दिली होती.

या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पती-पत्नीने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“मी यापूर्वीच उरुळी कांचन परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढत असल्याची आणि संशयास्पद दुचाकी फिरत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. अशा घटना टाळण्यासाठी पोलीस गस्त वाढवणे गरजेचे आहे.”
संतोष आबासो कांचन, माजी नियोजन समिती सदस्य, पुणे

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 16, 2026

March 16, 2026

March 16, 2026

March 16, 2026

March 16, 2026

March 16, 2026