मुंबई : मुंबईसाठी नैसर्गिक संरक्षणभिंत मानल्या जाणाऱ्या कांदळवनांवर भू-माफियांनी अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. बोरीवली परिसरात सुमारे ५० एकर कांदळवनांची कत्तल करून त्या ठिकाणी अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि झेप्टोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची बेकायदा गोदामे उभारण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी गुरुवारी विधानसभेत केला. या प्रकरणी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.
या आरोपांची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. गुगल मॅपिंग आणि जुन्या नकाशांच्या आधारे संबंधित जागेची पडताळणी केली जाईल आणि दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
उपाध्याय यांनी सांगितले की, बोरीवलीतील बोरकर कंपाऊंड परिसरात कांदळवने तोडून मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला आहे. त्या ठिकाणी पत्र्याची गोदामे आणि ताडपत्रीचे गाळे उभारले असून, स्थानिक मच्छीमार बांधवांना तसेच परिसरात खेळणाऱ्या मुलांना बाऊन्सर्समार्फत दमदाटी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींनाही बाऊन्सर्सच्या अरेरावीला सामोरे जावे लागल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी एस. जी. कवठे यांनी या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणीही उपाध्याय यांनी केली. तसेच अतिक्रमित जमिनींवर गोहत्येसारखे प्रकार घडत असल्याचा गंभीर दावा त्यांनी सभागृहात केला.
या मुद्द्यावर आमदार मनीषा चौधरी यांनीही आक्रमक भूमिका घेत कांदळवनांची कत्तल थांबवण्यासाठी महसूल व वन विभागाची संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी केली.
दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर वन, महसूल, महानगरपालिका आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित केले जाईल. सॅटेलाईट इमेजेस आणि गुगल मॅपिंगच्या आधारे कांदळवनांचे नुकसान झाले आहे का याची तपासणी करून सत्य बाहेर आणले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.





