दुबई / मुंबई, मार्च 2026 : क्रीडा, प्रसारमाध्यमे आणि स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 ने नवे जागतिक बेंचमार्क प्रस्थापित केले आहेत. 5 मार्च रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामन्याने डिजिटल प्रेक्षकसंख्येचा ऐतिहासिक टप्पा गाठला.
भारतातील आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारवर या सामन्यादरम्यान तब्बल 65.2 दशलक्ष समकालीन प्रेक्षक नोंदले गेले. कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाइव्ह इव्हेंटसाठी नोंदवली गेलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक प्रेक्षकसंख्या ठरली आहे. या सामन्याला जिओहॉटस्टारवर एकूण 619 दशलक्ष व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वाधिक स्ट्रीम झालेला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
दोन्ही डावांत मिळून 499 धावा झालेल्या या थरारक सामन्याने भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. मुंबईत झालेल्या या सामन्याने नोव्हेंबर 2024 मध्ये एका आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने नोंदवलेल्या 65 दशलक्ष प्रेक्षकांच्या आधीच्या विक्रमालाही मागे टाकले. विशेष म्हणजे तो विक्रम विविध बाजारपेठांतील एकत्रित प्रेक्षकसंख्येमुळे झाला होता, तर जिओहॉटस्टारचा विक्रम एका सामन्यावर आधारित आहे.
या उपांत्य सामन्याने भारतीय संघाची प्रचंड लोकप्रियता, निर्णायक सामन्याचा रोमांच आणि चाहत्यांचा उत्साह यांचे प्रतीक म्हणून आयसीसी स्पर्धेची वाढती लोकप्रियता अधोरेखित केली.
लिनियर टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर या सामन्याला 320 दशलक्षांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले. तर एकूण स्क्रीन टाइम 23 अब्ज मिनिटांपेक्षा अधिक नोंदवला गेला, ज्यामुळे हा सामना टी-20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, “भारत-इंग्लंड उपांत्य सामन्यादरम्यान नोंदवलेली प्रेक्षकसंख्या क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाचे द्योतक आहे. हा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात झालेली प्रगतीही यावरून दिसून येते. हा विश्वचषक मैदानावरील खेळाबरोबरच लाखो चाहत्यांच्या सहभागामुळेही लक्षात राहील.”
जिओस्टारचे उपाध्यक्ष उदय शंकर म्हणाले, “हा विक्रम जिओस्टारच्या तांत्रिक आणि सर्जनशील क्षमतेचे तसेच क्रिकेट अधिक व्यापक करण्याच्या आयसीसीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. दर तीनपैकी एक भारतीय प्रेक्षकाने हा उपांत्य सामना पाहिला. इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रेक्षकांना अखंड अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर आवश्यक असतो.”
सामन्यादरम्यान नोंदवलेल्या 619 दशलक्ष व्ह्यूजने 2024 च्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यादरम्यान नोंदवलेल्या 533 दशलक्ष व्ह्यूजचा विक्रमही मागे टाकला.
अंतिम सामना अद्याप बाकी असतानाच आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 ने डिजिटल आणि ब्रॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
या स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून प्रेक्षकांना हा सामना जिओहॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येणार आहे.









