महाराष्ट्रातून गोव्याकडे चला! डिसेंबरमध्ये ‘सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल’चा सांस्कृतिक घ्या अनुभव

By: Editor_Manas

On: Monday, October 19, 2026 3:53 PM

Google News
Follow Us

पुणे, १७ ऑक्टोबर २०२६ : यंदाच्या डिसेंबरमध्ये नेहमीच्या दिनचर्येतून थोडा विरंगुळा घेत गोव्यातील कला आणि संस्कृतीच्या अनोख्या विश्वाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. ‘सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल’ हा आठ दिवसांचा कला महोत्सव १३ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत गोव्यातील पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे. संगीत, नाटक, चित्रपट, दृश्यकला, हस्तकला, डिझाइन आणि खाद्यसंस्कृती अशा विविध कलाप्रकारांचा अनुभव या महोत्सवात घेता येणार आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना गोव्याच्या सहलीसोबतच समृद्ध सांस्कृतिक अनुभवाची जोड देण्याची संधी या महोत्सवामुळे मिळणार आहे.

मुंबई आणि गोवा यांच्यात संगीत, स्थलांतर आणि विविध समुदायांच्या माध्यमातून दीर्घकाळापासून सांस्कृतिक संबंध निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पणजी येथे होणाऱ्या या महोत्सवात महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी अनेक आकर्षणे असणार आहेत. मुंबईच्या सांस्कृतिक जीवनाशी जोडलेल्या संगीत आणि कथांपासून ते नाट्यप्रयोग, चित्रपट आणि समकालीन कलाविष्कारांपर्यंत अनेक गोष्टींचा अनुभव आठ दिवसांत घेता येणार आहे.

‘ईस्ट इंडियन म्युझिक कंपनी’ आणि ‘जिझस बँड’ हा यंदाच्या महोत्सवातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. अंकुर तिवारी यांनी या कार्यक्रमाचे संकलन केले आहे. मुंबईतील ईस्ट इंडियन समुदायाच्या समारंभांमध्ये पारंपरिकरीत्या सादर होणाऱ्या ईस्ट इंडियन आणि कोंकणी गीतांचा या कार्यक्रमात उत्सव साजरा केला जाणार आहे. मुंबईजवळील उत्तन येथील ब्रास बँड असलेला जिझस बँड आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक संगीतशैलीतून मुंबई आणि गोवा यांच्यातील सांस्कृतिक नात्याला उजाळा देणार आहे.

याशिवाय स्वानंद किरकिरे यांचा ‘बावरा लाइव्ह’ हा कार्यक्रम तसेच ताबा चाके, सुदान, हॅशबास लाइव्ह आणि रंज+ क्लिफर यांचे संगीत सादरीकरणही अनुभवता येणार आहे. स्वतंत्र संगीतप्रकारांमध्ये रस असणाऱ्यांसाठी महोत्सवाचा स्वतंत्र संगीत उपक्रम असलेल्या ‘बी-साइड’ अंतर्गत १६ ते १९ डिसेंबर दरम्यान आर्ट पार्क येथे किस नुका (लाइव्ह), डायरेक्ट ड्राइव्ह (व्हिनाइल), मॅरियन हॉक्स, पॅनेलिया आणि शेरल यांचे कार्यक्रम होणार आहेत.

महोत्सवाच्या कार्यक्रमांविषयी बोलताना सेरेंडिपिटी आर्ट्सचे संस्थापक आणि संरक्षक सुनील कांत मुंजाल म्हणाले, “महोत्सवाच्या सुरुवातीपासूनच विविध कलाप्रकार, कल्पना आणि समुदाय यांच्यात संवाद घडवून आणण्याला आम्ही प्रोत्साहन दिले आहे. यंदाचा कार्यक्रमही याच विचारावर आधारित आहे. विविध कलाप्रकार, भौगोलिक प्रदेश आणि पिढ्यांमधील कलाविष्कारांचा व्यापक समावेश त्यात करण्यात आला आहे. परंपरा आणि प्रयोगशीलता, स्थानिक आणि जागतिक विचार तसेच प्रस्थापित कलापद्धती आणि नव्या कलाकारांच्या अभिव्यक्ती यांच्यातून अनपेक्षित आणि रोमांचक कलानुभव निर्माण होतील, अशी आम्हाला आशा आहे. प्रेक्षकांनी कलेविषयी कुतूहल आणि खुलेपणा बाळगून महोत्सवाचा अनुभव घ्यावा आणि नव्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहावे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”

महोत्सवातील नाट्यविभागात ऐतिहासिक कथानके, लोकप्रिय संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील भावविश्व मांडणाऱ्या नाट्यकृतींचा समावेश आहे.

आदित्य रावल लिखित आणि डॅनियल ओवेन डिसोझा दिग्दर्शित ‘द क्वीन’ या नाटकातून सोळाव्या शतकातील भारतातील राणी दुर्गाची कथा उलगडते. पतीने दुसरे लग्न केल्यानंतर आपले सत्तास्थान आणि अधिकार टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या राणीची ही कथा आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सत्ताकांक्षा, अधिकार आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष या विषयांची मांडणी या नाटकातून केली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रस असणाऱ्यांसाठी सोहैला कपूर यांनी संशोधन, लेखन, संकल्पना, रचना आणि निवेदन केलेले ‘आनंद ही आनंद’ हे सादरीकरण विशेष ठरणार आहे. चेतन आनंद, देव आनंद आणि विजय ‘गोल्डी’ आनंद यांच्या जीवनाचा आणि कार्याचा वेध या सादरीकरणातून घेतला जातो. चित्रपटांतील दृश्यफिती आणि वैयक्तिक आठवणींच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आनंद कुटुंबाचा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.

‘बेली ऑफ द बीस्ट’ या नाट्यप्रयोगात मातृत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील चार महिलांचे अनुभव मांडण्यात आले आहेत. छायाप्रतिमा कठपुतळी, थेट संगीत, हालचाली आणि उपरोधिक विनोद यांच्या माध्यमातून महिलांचे अनुभव आणि मातृत्वातील गुंतागुंत या प्रयोगात उलगडली जाते.

‘ट्रान्झिएंट जिओग्राफीज’ या प्रदर्शनात जमीन, स्थलांतर, सीमा, श्रम आणि माणसांचे आपल्या परिसराशी असलेले नाते या विषयांचा कलावंतांनी वेध घेतला आहे. या प्रदर्शनात मुंबईस्थित कलाकार विक्रांत भिसे यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. त्यांच्या कलाविष्कारातून जात, श्रम आणि सामाजिक न्यायाशी संबंधित प्रश्न मांडले जातात. तसेच मुंबईत स्थापन झालेल्या शहरी संशोधन आणि रचना क्षेत्रातील ‘अर्ब्झ’ (URBZ) या समूहाचाही सहभाग आहे. हा समूह विविध वस्त्या आणि तेथील रहिवाशांसोबत काम करतो.

चित्रपट आणि ध्वनी यांचा संगम साधणारा ‘आयज शॅल डीसिव्ह’ हा चित्रपट दिग्दर्शिका आणि संगीतकार स्नेहा खानवलकर तसेच कलाकार सुदर्शन शेट्टी यांनी साकारला आहे. मुंबई, कोलकाता आणि वाराणसीसह विविध शहरांमध्ये १६ मिमी चित्रपटपट्टीवर चित्रित केलेल्या या कलाकृतीत शहरी संगीतपरंपरा, ब्रास बँड, सामूहिक स्वर, तालवाद्ये आणि दैनंदिन जीवनातील आवाजांचा वापर करण्यात आला आहे. या ध्वनींच्या माध्यमातून शहराचे बहुआयामी चित्र उभे राहते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 19, 2026

October 19, 2026

October 19, 2026

October 19, 2026

October 19, 2026

October 19, 2026